
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एडीसी (ADC) म्हणून काम करणारे मेजर ऋषभ सिंग संब्याल सध्या इंटरनेटवर 'नॅशनल क्रश' बनले आहेत. त्यांचा रुबाब, कर्तव्यावरील निष्ठा आणि आदरयुक्त वागणूक यामुळे लाखो लोक त्यांच्या प्रेमात पडलेत. पण त्यांनी अचानक राजीनामा देऊन सगळ्यांनाच धक्का दिला. अवघ्या १२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी वेळेआधीच निवृत्ती (Premature Retirement) घेतली. निवृत्तीच्या वेळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्याचे फोटोही शेअर केले. एवढं चांगलं करिअर सोडून या अधिकाऱ्याने अचानक असा निर्णय का घेतला, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. अखेर स्वतः ऋषभ यांनीच इन्स्टाग्राम लाईव्हवर येऊन या प्रश्नांची उत्तरे दिली.
निवृत्त होताच ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. हँडसम ऋषभ यांच्यावर लाखो तरुणी फिदा आहेत. त्यामुळेच त्यांच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढतेय. आता निवृत्त मेजर ऋषभ सिंग संब्याल यांच्या इन्स्टाग्रामवरील 'पेड सबस्क्रिप्शन'ची (Paid Instagram) जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या एक्सक्लुझिव्ह पोस्ट पाहण्यासाठी १५०० हून अधिक लोकांनी आधीच सबस्क्रिप्शन घेतलंय. आयफोन युजर्ससाठी महिन्याला १९९ रुपये आणि अँड्रॉइड युजर्ससाठी १८० रुपये फी आहे. या पेड सबस्क्रिप्शनमधून ऋषभ महिन्याला जवळपास तीन लाख रुपये कमवत आहेत.
दिवसेंदिवस त्यांच्या पेड सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांची संख्या वाढतेय, जे पाहून अनेक सोशल मीडिया युजर्सही थक्क झालेत. जे लोक पैसे देऊन सबस्क्राईब करतात, त्यांना खास बॅज मिळतो आणि त्यांच्या सोशल चॅनेल्सचा अॅक्सेस मिळतो. ते 'मला काहीही विचारा' (Ask Me Anything) सारखे सेशन्सही घेतात. सध्या त्यांच्या इन्स्टाग्रामवर पेड सबस्क्रायबर्ससाठी पाच एक्सक्लुझिव्ह स्टोरीज आणि एक रील उपलब्ध आहे.
मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी सांगितलं की, त्यांच्या राजीनाम्यामागे वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणं आहेत. कामाच्या ठिकाणी कोणतीही नाराजी नव्हती, हे त्यांनी स्पष्ट केलं. "भारतीय लष्करात सेवा करणं हे माझं लहानपणचं स्वप्न होतं. करिअरच्या सुरुवातीलाच मला हा युनिफॉर्म काढावा लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. पण काही परिस्थिती माणसाचा प्रवास बदलू शकते. माझ्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं," असं ते म्हणाले.
माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. कुटुंबासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतरच मी हा मोठा निर्णय घेतलाय, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या निवृत्तीबद्दल अनेक अफवा पसरत होत्या. काहींनी तर ते लग्न करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. पण यावर बोलताना ऋषभ म्हणाले की, "यात काहीही तथ्य नाही, सध्या लग्नाचा कोणताही प्लॅन नाही." त्यांनी राजीनाम्याचं नेमकं कारण उघड केलं नसलं तरी, आयुष्याच्या पुढच्या टप्प्याबद्दल लवकरच माहिती देणार असल्याचं त्यांनी सुचवलंय. आता ते लष्करात नसले तरी, देशाची सेवा करण्याची त्यांची इच्छा संपलेली नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.