
हरियाणा : हरियाणाच्या कैथलमध्ये एका लग्नात नवरीच्या एन्ट्रीवरून मोठा राडा झाला. जयमालेच्या आधी नवरीने डान्स केल्याने नवरदेवाचे वडील आणि मोठा भाऊ चांगलेच भडकले. वाद इतका वाढला की लग्नच मोडलं.
लाल रंगाचा लेहेंगा घातलेली नवरी थेट जयमालेसाठी स्टेजवर जाण्याऐवजी डान्स करत होती आणि तिचे व्हिडिओ रील्स बनवले जात होते. इथूनच सगळा गोंधळ सुरू झाला. या अनपेक्षित प्रकारामुळे सासरची मंडळी चिडली आणि भर मंडपात वाद सुरू झाला.
लग्नाच्या विधींपेक्षा सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याला जास्त महत्त्व दिल्याने हा वाद वाढला. नवरीने आधी कंटेंट क्रिएशनला पसंती दिली. यामुळे नवरदेवाची फॅमिली चांगलीच नाराज झाली, कारण त्यांना साध्या पद्धतीने लग्न पार पडावं असं वाटत होतं.
नवरीचा डान्स सुरूच राहिल्याने मंडपातलं वातावरण तापलं. संध्याकाळच्या मुख्य विधींमध्ये हा डान्स म्हणजे विनाकारण आणलेला अडथळा आहे, असं नवरदेवाच्या जवळच्या नातेवाईकांना वाटलं.
हा प्रकार कौटुंबिक कार्यक्रमाला न शोभणारा असल्याचं सांगत सासरे आणि मोठ्या भावाने या डान्सला कडाडून विरोध केला. हॉलमध्ये दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कार्यक्रमाच्या शिस्तीवरून वातावरण चांगलंच तापलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडपात जोरदार आरडाओरडा झाला आणि नवरदेवाच्या घरच्यांनी लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. वऱ्हाड तसंच माघारी फिरलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आलेले पाहुणेही शॉकमध्ये गेले आणि लग्न अर्धवटच राहिलं.
या व्हिडिओवर एका युजरने लिहिलंय, "तिला एन्जॉय करू द्या यार, तिचा दिवस आहे तो." दुसऱ्याने म्हटलंय, "लग्नाआधीच डान्स केला, पण नुकसान काहीच नाही." आणखी एकाने लिहिलंय, "हे थोडं फेक वाटतंय. पण आजकाल काही सांगता येत नाही." तर एका युजरने म्हटलंय, “बरं झालं, नाहीतर सासरी या नवरीला खूप त्रास झाला असता.” आता हा व्हिडिओ खरा आहे की स्क्रिप्टेड, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.