
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बेरोजगारी, पेपर लीक, महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग, शिक्षण आणि संविधानाच्या संरक्षणाचे मुद्दे उपस्थित केले. डिग्री असूनही नोकरी नसल्याचे सांगत या निवडणुकीत बेरोजगारीसह जातन्यायाचा मुद्दाही महत्त्वाचा राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी लॉन्च केलेल्या वेबसाईटशी संबंधित देशभरातील आंदोलनांचा प्रभाव असल्याचा दावाही सपकाळ यांनी केला. आदिवासी विद्यार्थी आणि NSUI पदाधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत पोलिसांच्या दाव्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आपल्याकडे CCTV फुटेज असल्याचे सांगत पोलीस परवानगी किंवा वॉरंटशिवाय काँग्रेस मुख्यालयात घुसल्याचा आरोप त्यांनी केला. अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांना तातडीने सोडावे, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानाला घेराव घालू, असा इशारा सपकाळ यांनी दिला. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांच्या पाठीशी काँग्रेस आणि मित्रपक्ष पूर्ण ताकदीने असल्याचेही त्यांनी सांगितले. अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी किंवा बेबनाव नसून परस्परपूरक भूमिका असल्याचे सपकाळ म्हणाले.