
Dowry Viral Video : गाझियाबादमधल्या एका लग्नात चक्क कोट्यवधी रुपयांचा हुंडा जाहीरपणे दिल्याचा एक व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या उत्साहाने घोषणा करतोय की, नवरदेवाच्या कुटुंबाला एक BMW कार आणि १ कोटी १ लाख ११ हजार रुपये रोख मिळाले आहेत. भारतात हुंडा घेण्या-देण्यावर कडक कायदे असूनही ही प्रथा कशी खुलेआम सुरू आहे, यावर या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. व्हिडीओमध्ये जमलेले अनेक लोक या घोषणेमुळे प्रभावित झाल्याचं दिसतंय.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युझर्सनी हुंडाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. भारतात १९६१ च्या हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे. यासाठी ६ महिन्यांपासून ते २ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. मात्र, या व्हायरल क्लिपची आणि त्यातील दाव्यांची सत्यता स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही. हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आल्याचं समजतंय.
हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल होताच, युझर्सनी कमेंट सेक्शनमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
एका युझरने लिहिलं, "मला समजत नाही की, कुटुंबं आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलाला १ कोटी रुपये का देतात. तेच पैसे मुलीला एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी का देत नाहीत? किंवा तिला व्यवसायात रस नसेल, तर तिच्या नावावर प्रॉपर्टी तरी विकत घ्या. हे पैसे नवरदेवाच्या हातात का द्यायचे?"
दुसऱ्या एका युझरने कमेंट केली, "आपल्याला आपल्या समाजातून ही चुकीची प्रथा काढून टाकण्याची गरज आहे. पाकिस्तानात ही फार मोठी समस्या नाही, पण भारतात आहे."
इतर अनेकांनी या प्रथेची खिल्ली उडवली आणि अशा महागड्या लग्नांमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक दबावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
एका युझरने तर उपरोधिकपणे लिहिलं, "त्याला बांगड्या आणि साडी पण देऊन टाका."
आणखी एका युझरने म्हटलं, "लग्नं इतकी महागडी बनवणं थांबवा, कारण अशा हुंड्यांमुळे गरीब लोकांना आपल्या मुलींची लग्नं करणं शक्य होणार नाही."