गौतम अदानी यांनी मुलाच्या साध्या लग्नानंतर ₹१०,००० कोटींचे दान केले

मुलाचे लग्न साधेपणाने पार पडल्यानंतर, गौतम अदानी यांनी विविध सामाजिक कार्यांसाठी तब्बल १०,००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

अहमदाबाद : भारतातील क्रमांक १ आणि आशियातील क्रमांक २ श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचे कनिष्ठ पुत्र जीत यांचा विवाह शुक्रवारी पार पडला. नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत साध्या समारंभात जीत यांनी हिरे व्यापाऱ्यांची कन्या दिवा शहा हिच्याशी लग्नगाठ बांधली. 

मुलाचे लग्न साधेपणाने पार पडल्यानंतर, गौतम अदानी यांनी विविध सामाजिक कार्यांसाठी तब्बल १०,००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत एक्स वर पोस्ट करत गौतम अदानी म्हणाले, 'देवाच्या कृपेने जीत आणि दिवा यांचा विवाह सोहळा पार पडला. हा एक छोटेखानी आणि खाजगी कार्यक्रम असल्याने अनेक शुभचिंतकांना आमंत्रित करता आले नाही'.

अदानींचे मोठे दान: अदानी कुटुंबातील लग्न साधेपणाने पार पडले असले तरी, विविध सामाजिक कार्यांसाठी तब्बल १०,००० कोटी रुपयांचे दान देऊन गौतम अदानी यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. ही रक्कम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाच्या खर्चाच्या दुप्पट आहे. हे पैसे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा आणि निश्चित रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या जागतिक कौशल्य संस्थांच्या स्थापनेसाठी वापरले जातील.

५०० दिव्यांग वधूंना प्रत्येकी १० लाख रुपये: दरवर्षी ५०० दिव्यांग वधूंच्या विवाहाला प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा जीत अदानी आणि दिवा शहा यांनी केली आहे.

- अहमदाबाद येथे काल गौतम अदानी यांच्या कनिष्ठ पुत्राचा विवाह सोहळा
- हिरे व्यापाऱ्यांची कन्या दिवा शहा हिच्याशी साध्या समारंभात विवाह
- त्यानंतर १०,००० कोटी रुपयांचे दान देण्याची घोषणा
- मुकेश अंबानी यांनी मुलाच्या लग्नासाठी ५,००० कोटी रुपये खर्च केले होते
- त्या तुलनेत अदानी यांचे दान दुप्पट; सामाजिक कार्यासाठी वापर
- दरवर्षी ५०० दिव्यांग वधूंना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची जीत-दिवा यांची घोषणा

Share this article