
मुंबई : प्रसिद्ध ‘वाय वाय’ नूडल्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या राजस्थानातील कारखान्यात अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने FSSAI कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारखान्याच्या जमिनीवर पडलेले, तुटलेले नूडल्स गोळा करून त्यापासून भुजिया तयार केली जात असल्याची धक्कादाक बाब तपासणीत समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित प्रोडक्टचे उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नूडल्सचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई राजस्थानमधील CG Foods India या कंपनीच्या कारखान्यावर करण्यात आली. ही कंपनी नेपाळचे अब्जाधीश बिनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखालील CG Corp Global समूहाचा भाग आहे. तर बिनोद चौधरी हे ‘नूडल किंग’ म्हणून ओळखले जातात. एफएसएसआयएच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत कारखान्यात जमिनीवर पडलेले, तुटलेले नूडल्स पुन्हा प्रक्रियेत आणून त्यावर कोणतीही हिट ट्रिटमेंट न करता भुजिया तयार केली जात असल्याचे आढळून आले आहे.
तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी कारखान्यातील जवळपास 32 हजार किलो प्रोडक्टचा साठा जप्त केला आहे. याशिवाय एक्सपायरी झालेले प्रोडक्ट्स असलेल्या 1,925 पेट्याही सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एफएसएसआयएने या प्रकरणात संबंधित खाद्य व्यवसाय चालकाविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच उत्पादनांचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत देशभरात तपासणी मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रात एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फूडच्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.यापूर्वी राज्यभर करण्यात आलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर डॉमिनोजच्या चार आणि पिझ्झा हटच्या एका आउटलेटचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.