
भारतात सलग एक वर्ष राहिल्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला आहे, असं लुकास या परदेशी पर्यटकाने सांगितलं. भारतातून मायदेशी परतताना दिल्ली विमानतळावर त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. यात त्याने आपले अनुभव आणि भारतातून काय शिकायला मिळालं, याबद्दल सांगितलं. 'एखाद्या ठिकाणचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिथली माणसं असतात,' या त्याच्या वाक्याने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
लुकासने आपल्या आठवणी सांगताना म्हटलं की, भारतात आल्यावर सुरुवातीच्या दिवसांत इथल्या ट्रॅफिक आणि भयंकर उकाड्यामुळे तो खूप वैतागला होता. पण या परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्याला जास्त वेळ लागला नाही. हळूहळू भारताची जीवनशैली आणि इथली विविधता आपल्याला समजत गेल्याचंही त्याने सांगितलं.
भारत हा असा देश आहे जिथे तुम्ही एकाच वेळी आनंद, राग आणि दुःख अनुभवू शकता, असं त्याचं निरीक्षण आहे. कधीकधी एकाच रस्त्यावर, अगदी एकाच मिनिटात तुम्हाला वेगवेगळ्या भावनांचा अनुभव येऊ शकतो. इथल्या लोकांनी त्याला त्यांचं जेवण, घर, संस्कृती आणि जीवनशैलीची ओळख करून दिली. याच अनुभवांमुळे भारतातला आपला मुक्काम कायम लक्षात राहील, असं लुकासने पुढे सांगितलं.
सुरुवातीला तो प्रत्येक गोष्ट फक्त दिसायला सुंदर आहे का, याचाच विचार करायचा. पण नंतर त्याचा दृष्टिकोन बदलला आणि ती गोष्ट मनाला आनंद देतेय का, याकडे त्याने लक्ष द्यायला सुरुवात केली. भारतातून मिळालेली ही सर्वात मोठी शिकवण असल्याचं लुकास मानतो. एखादा देश तिथल्या ठिकाणांवरून नाही, तर तिथे भेटलेल्या माणसांवरून आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांवरून आठवणीत राहतो, असं तो म्हणाला. भारताचे आभार मानतानाच लवकरच पुन्हा भेट देण्याची आशाही त्याने व्यक्त केली.