
नवी दिल्ली: २००२ च्या साबरमती ट्रेन जळीतकांडाबाबत सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या दाव्यावर गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) माजी प्रमुख राकेश अस्थाना यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, दोषींना शिक्षाही झाली आहे. हा आग लावण्याचा प्रकार जाणीवपूर्वक होता आणि त्यासाठी ज्वलनशील पदार्थाचा वापर करण्यात आला होता, असे अस्थाना यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. दुसरीकडे, सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकात या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी आपल्या 'बिलाँगिंग' या आठवणींच्या पुस्तकात माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना डावलल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. नरसिंह राव यांचा उल्लेख केल्यास देशातील काही घटकांच्या भावना दुखावतील, असे वाटून सोनिया गांधींनी त्यांचा उल्लेख टाळला असावा, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. नरसिंह राव यांच्या कुटुंबानेही यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधींचे हे पुस्तक काही महत्त्वाच्या नेत्यांकडे केलेल्या दुर्लक्षाचे उदाहरण बनल्याची टीका होत असून, पक्षातही यावरून अस्वस्थता वाढताना दिसत आहे.