दुर्घटना: नदीत कोसळलेला ट्रक, ६० जणांचा मृत्यू

प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळून ६० जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना दक्षिण सिदामा येथे घडली असून, बचावकार्य सुरू आहे.

अ‍ॅडिस अबाबा: कझाकस्तान, दक्षिण कोरियातील विमान अपघातानंतर आफ्रिकेतील पूर्व राष्ट्र इथिओपियामध्ये भीषण दुर्घटना घडली असून, ६० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्याने ६० जण जलासमाधी झाले आहेत. दक्षिण सिदामा येथे ही भीषण दुर्घटना घडली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रविवारी रात्री ही घटना घडली. जखमींना बोना जनरल रुग्णालयात दाखल करून उपचार दिले जात आहेत.

सरकारी मालकीच्या इथिओपियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (EBC) च्या वृत्तानुसार, ट्रकमधील सर्व लोक लग्नाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. खराब रस्त्यांमुळे इथिओपियामध्ये सातत्याने अपघात होत असतात. चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि वाहनाच्या दुरुस्तीमुळे हा अपघात झाला. नदीच्या काठावर असूनही रस्त्याच्या कडेला कोणत्याही प्रकारचे सुरक्षाकवच बांधलेले नव्हते. रस्त्यावर कोणतेही सुरक्षा उपाययोजनाही नव्हत्या.

EBC च्या वृत्तानुसार, चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक नदीत कोसळला. नदीत शोधमोहीम अजूनही सुरू आहे. सध्याच्या माहितीनुसार ६० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र ट्रकमध्ये किती लोक प्रवास करत होते याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. बचावकार्य सुरू आहे.

२०१८ मध्ये असाच एक मोठा भीषण अपघात झाला होता. विद्यार्थी प्रवास करत असलेले वाहन खोल दरीत कोसळल्याने ३८ जणांचा मृत्यू झाला होता.

रविवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेतील म्वान येथे एक विमान कोसळले होते. १८१ पैकी १७९ जणांचा मृत्यू झाला. अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियाच्या चेचन्या प्रांताची राजधानी ग्रोझनी येथे जाणारे अझरबैजान एअरलाइन्सचे विमान २५ डिसेंबर रोजी कोसळले होते. या विमानात पाच कर्मचारींसह ६७ प्रवासी होते. या दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला होता.

Share this article