
मुंबई : एका कुटुंबाला दिवाळी चांगलीच महागात पडली आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी नव्या वॉशिंग मशीनवर दिवा ठेवल्याने तिला आग लागल्याची घटना घडली. हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सणाच्या आनंदात या घटनेमुळे पाणी फेरलं गेलं असून कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे.
व्हायरल झालेल्या माहितीनुसार, ही वॉशिंग मशीन अवघ्या दोन दिवसांपूर्वी धनत्रयोदशीला विकत घेतली होती. दिवाळीच्या पूजेदरम्यान कुटुंबाने या मशीनवर तेलाचा दिवा ठेवला होता, ज्यामुळे मशीनला आग लागली आणि तिची राखरांगोळी झाली. या मशीनवर पाच वर्षांची वॉरंटी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण, आगीच्या या घटनेमुळे कंपनी वॉरंटी देणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
या घटनेमुळे सणासुदीच्या काळात घरातील उपकरणांभोवती पारंपरिक पूजा करताना किती काळजी घेतली पाहिजे, याची चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक किंवा ज्वलनशील पदार्थांजवळ दिवे, मेणबत्त्या ठेवणे धोक्याचे ठरू शकते. दिवे नेहमी सुरक्षित आणि न पेटणाऱ्या जागेवर ठेवल्यास असे अपघात टाळता येऊ शकतात. सण साजरे करताना आगीपासून बचाव करण्याचे उपाय किती महत्त्वाचे आहेत, हेच या घटनेने दाखवून दिलं आहे.