
नवी दिल्ली : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनापूर्वी डीलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. द्रमुक (DMK) मधील काही खासदार अटींसह केंद्र सरकारच्या डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचा दावा काँग्रेस खासदार मनोज कुमार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. DMK खासदारांसोबत चर्चेत काय घडलं? काँग्रेस खासदार मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या संसदीय स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान त्यांची द्रमुकच्या काही खासदारांसोबत चर्चा झाली. यावेळी त्यांनी डीलिमिटेशन विधेयकाबाबत पक्षाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर द्रमुकच्या खासदारांनी काही अटींची पूर्तता झाल्यास केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिल्याचे मनोज कुमार यांनी सांगितले.
मात्र, संबंधित खासदारांनी नेमक्या कोणत्या अटी मांडल्या होत्या, हे आपल्याला आठवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. द्रमुकसारखा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊ शकतो, याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाची अंतिम भूमिका 30 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. द्रमुकची भूमिका अद्याप स्पष्ट नाही दरम्यान, द्रमुकचे प्रवक्ते टी.के.एस. एलंगोवन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सावध पवित्रा घेतला आहे. यापूर्वी मांडण्यात आलेल्या डीलिमिटेशन विधेयकाला पक्षाने विरोध केला होता. मात्र, नव्या विधेयकातील तरतुदी तपासल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
नव्या प्रस्तावात राज्यांच्या हितसंबंधांचा विचार करण्यात आला आहे का, तसेच यापूर्वी मांडलेल्या आक्षेपांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत का, याची पडताळणी केली जाणार आहे. राज्यांच्या मागण्यांचा आणि सूचनांचा समावेश असल्यास त्यावर सकारात्मक विचार होऊ शकतो, असेही द्रमुकने सूचित केले आहे. 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेचे कामकाज 30 नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. हे विशेष अधिवेशन 3 डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात केंद्र सरकारकडून परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकांवर पुन्हा हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी एप्रिल महिन्यात मांडण्यात आलेले संविधान (131 वे घटनादुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. 17 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने 298, तर विरोधात 230 मते पडली होती. घटनादुरुस्ती मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेला दोन तृतीयांश पाठिंबा सरकारला मिळाला नव्हता. लोकसभेतील बहुमताचे गणित महत्त्वाचे परिसीमन विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला विरोधी पक्षांतील काही खासदारांचा पाठिंबा मिळवणे महत्त्वाचे ठरू शकते. सध्याच्या राजकीय गणितानुसार, एनडीएकडे मित्रपक्षांसह 298 खासदारांचे संख्याबळ असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
द्रमुकचे 22, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि वायएसआर काँग्रेसचे 4 खासदार सरकारच्या बाजूने आल्यास हे संख्याबळ 353 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे या पक्षांची भूमिका सरकारसाठी निर्णायक ठरू शकते.
एप्रिलमध्ये मंजूर न होऊ शकलेले विधेयक आणि आता पुन्हा सुरू झालेल्या राजकीय हालचाली पाहता, 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांची अंतिम भूमिका काय असणार, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील.