
दिल्लीच्या ओखला फेज-१ परिसरात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. एका गोदामात ट्रकवरून ऑक्सिजन सिलेंडर उतरवत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या घटनेत एका ३५ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण जखमी झाले आहेत.
मृत व्यक्तीचं नाव मोहित सिंह असून तो जयपूरचा रहिवासी होता. तो एसएम ट्रेडर्समध्ये हेल्पर म्हणून काम करत होता. या स्फोटात त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये उमेश, अरविंद, मनोज आणि पंकज यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, याची माहिती घेतली जात आहे.
ही घटना सकाळी साधारण १०:४३ वाजता ओखला फेज-१ मधील डी-२३ या ठिकाणी घडली. गाझियाबादहून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आलेला एक टाटा ४०७ ट्रक गोदामात आला होता. ट्रकवरून सिलेंडर खाली उतरवण्याचं काम सुरू असताना, एक सिलेंडर गाडीवरून खाली रस्त्यावर पडला आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला. प्राथमिक तपासात फक्त एकाच सिलेंडरचा स्फोट झाल्याचं समोर आलं आहे.
हे गोदाम एसएम ट्रेडर्स नावाच्या कंपनीचं असून, इथे इंडस्ट्रियल ऑक्सिजन सिलेंडरचा व्यापार आणि स्थानिक पातळीवर वितरण केलं जातं. प्राथमिक चौकशीत इथे सिलेंडर भरण्याचा कोणताही प्लांट आढळलेला नाही. ही कंपनी गेल्या एक-दोन वर्षांपासून भाड्याच्या जागेत आपला व्यवसाय करत होती आणि इथे तीन ते चार कामगार काम करत होते.
हे सिलेंडर कुठून आणले होते, पुरवठादार कोण होता आणि सिलेंडरच्या साठवणुकीसाठी, हाताळणीसाठी आणि वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या होत्या की नाही, याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. घटनास्थळाला सील करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.
ओखलामधील ही घटना दिल्लीत सिलेंडर स्फोटाची पहिलीच घटना नाही. याआधी रविवारी दिल्लीच्या विवेक विहारमध्येही असाच एक स्फोट झाला होता. सीबीडी शाहदरा परिसरातील विवेक विहार पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या 'झुग्गी क्रमांक ११' मध्ये एका छोट्या एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत ३५ वर्षीय अनिल दास आणि त्यांची ३० वर्षीय पत्नी खुशबू हे दोघे जण गंभीररित्या भाजले होते.