
Delhi Mustafabad Building Collapse Update : उत्तर-पूर्वी दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात शनिवारी (19 एप्रिल) मध्यरात्री 3 वाजल्याच्या सुमारास चार मजली रहिवाशी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. शक्ती विहार परिसरातील गल्ली क्रमांक 1 मध्ये इमारत कोसळल्याची ही दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे.
सदर दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. ताज्या अपडेट्सनुसार, इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अद्याप काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आताही बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेवर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शोक व्यक्त केला आहे.
रेखा गुप्ता यांचे ट्विट
मुख्यमंत्री रेखा गुप्ताने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर असे लिहिले की, मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे विचलित झाले आहे. घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. दोषींच्या विरोधात कठोर कार्यवाही केली जाईल. बचाव कार्यासाठी DDMA, NDRF, DFS आणि अन्य एजेंसीकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. सर्व जखमींवर योग्य उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्यांच्या प्रति माझ्या संवेदना आहेत."