दिल्ली निवडणूक भाजप जाहीरनामा: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात गर्भवती महिलांना मदत, महिलांना मोफत सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन वाढ, युवकांना आर्थिक मदत अशा अनेक आश्वासनांचा समावेश आहे.
नवी दिल्ली: कोणत्याही निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर देणार्या आश्वासनांची यादी जाहीरनाम्याच्या स्वरूपात प्रसिद्ध करतात. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, २७ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत भाजप सरकार स्थापन होत आहे. निवडणूक प्रचारात भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक हमी दिल्या होत्या. दिल्लीतील मतदारांनी भाजपला बहुमत दिले असून, काही दिवसांतच त्यांना हमी मिळतील अशी अपेक्षा आहे. आप आणि काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात मोफत हमींसह दिल्लीच्या विकासाशी संबंधित अनेक योजना आणण्याचे आश्वासन दिले होते. मग आता भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे कोणते आहेत ते पाहूया.
भाजप जाहीरनाम्यातील प्रमुख १० मुद्दे
१.गर्भवती महिलांना ₹२१,००० ची एकरकमी आर्थिक मदत आणि सहा पौष्टिक आहार किट, तसेच पहिल्या बाळासाठी ₹५,००० आणि दुसऱ्या बाळासाठी ₹६,००० देण्याचे आश्वासन.
२.दिल्लीतील महिलांना दरमहा २,५०० रुपये. गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडरसाठी ५०० रुपये अनुदान मिळेल. होळी-दिवाळीला प्रत्येकी एक सिलिंडर मोफत दिला जाईल. दरमहा २०० युनिट मोफत वीज, २०,००० लिटर पाणी आणि डीटीएस आणि क्लस्टर बससेवेत महिलांना मोफत प्रवास पास.
३.६० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपयांपर्यंत वाढवले जाईल. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांचे पेन्शन २,५०० रुपयांवरून ३,००० रुपयांपर्यंत वाढवले जाईल.
४.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दिल्लीतील युवकांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत.
५.गरजू विद्यार्थ्यांना दिल्लीतील सरकारी शिक्षण संस्थांमध्ये केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण
६.दिल्लीतील गिग कामगारांना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा अपघात विमा
७.ऑटोचालकांना १० लाख रुपयांचा जीवन विमा + ५ लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाईल. ५० हजार रोजगार निर्मितीचे आश्वासन. यमुना रिव्हर फ्रंट बांधण्याचे भाजपने म्हटले होते.
८. राष्ट्रीय सामान्य मोबिलिटी कार्ड योजनेअंतर्गत, दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक ४,००० रुपयांपर्यंत मोफत प्रवास.
९.दिल्लीत आयुष्मान योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन.
१०. २० लाख स्वयंरोजगार संधी निर्माण करण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते.