
Delhi : दिल्लीच्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये सुरू असलेले संताचे कारनामे समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी नावाचा कथित संत विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याचे उघड झाले आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात नसून फरार आहे.
तक्रारीनुसार, स्वामी चैतन्यानंद रात्री उशिरा विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवत असे. "माझ्या खोलीत या, मी तुम्हाला परदेश दौऱ्यावर घेऊन जाईन. पैसे द्यावे लागणार नाहीत. ऐकलं नाही तर नापास करीन," अशा प्रकारचे मेसेजेस चॅटमध्ये आढळले आहेत. पीडित विद्यार्थिनींनीही सांगितले की, जर त्यांनी त्याला विरोध केला तर तो परीक्षेतील गुण कमी करण्याची धमकी देत असे.
या प्रकरणात संस्थेच्या तीन महिला वॉर्डनचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांनी मुलींना गप्प राहण्यासाठी दबाव आणला. तसेच विद्यार्थिनींच्या मोबाईलमधील चॅट्स डिलीट करण्यास भाग पाडले. तक्रार केल्यास वसतिगृहातून बाहेर काढण्याची धमकीही वॉर्डनकडून देण्यात आली होती. पोलिसांनी तिघींचे जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आश्रमातील अनेक दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. तसेच, चॅट्स पुसून टाकल्याचा आरोप आहे. बाबा आणि वॉर्डन यांनी मिळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शंका आहे. मात्र, पोलिसांनी डीव्हीआर आणि विद्यार्थिनींचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
तक्रार दाखल झाल्यावेळी स्वामी चैतन्यानंद लंडनमध्ये होता. त्याचे अखेरचे लोकेशन आग्रा येथील नोंदले गेले आहे. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
सध्या दिल्ली पोलिसांची पथके हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये छापे टाकत आहेत. बाबा वारंवार ठिकाण बदलत असल्यामुळे अडचण येत आहे. मात्र, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे.