बघा VIDEO, दलितांवर पाशवी अत्याचार, डोके मुंडवले, गवत खायला लावले, ड्रेनेजचं पाणी पाजलं, गुन्हेगार अजूनही मोकाट

Published : Jun 23, 2025, 07:29 PM ISTUpdated : Jun 23, 2025, 07:30 PM IST
dalit

सार

ही घटना केवळ दोन दलितांवरील अत्याचार नसून, संपूर्ण समाजाच्या समतेच्या मूल्यांवरील प्रश्नचिन्ह आहे. राज्य सरकारने आणि पोलिस प्रशासनाने यामध्ये त्वरित, कठोर आणि पारदर्शक कारवाई न केल्यास एक चुकीचा संदेश जाईल.

गंजाम (ओडिशा) - ओडिशामधील गंजाम जिल्ह्यात रविवारी घडलेल्या एका माणुसकीला काळिमा फासणार्या आणि संतापजनक घटनेमुळे देशभरात संताप उसळला आहे. धर्मकोट पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खरिगुमा गावात दोन दलित पुरुषांना गावकऱ्यांनी अमानुष मारहाण केली. ही घटना समाजाला हादरवणारी असून जातीय अत्याचार आणि जमावशाहीचा एक भीषण नमुना आहे.

गोवंश विकत घेतल्याचा आरोप आणि अमानुष वागणूक

सिंगीपूर गावातील बुलू नायक आणि बबुला नायक (दोघेही चाळीशीत) हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी तीन गाई विकत घेऊन परतत होते. त्याचवेळी खरिगुमा गावात जमावाने त्यांना अडवले. गोवंश तस्करीचा आळ त्यांच्यावर ठेवला. पैसे मागितले गेले. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. डोक्याचे अर्धवट मुंडण करून अपमानित करण्यात आले.

गुडघ्यावर बसून २ किलोमीटर चालायला लावले

त्यांना गुडघ्यावर बसून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जहाडा गावापर्यंत रांगत नेण्यात आले. एवढ्यावरच न थांबता गवत खायला लावले. ड्रेनेजचं पाणी पाजण्यात आले. या घटनेने देशाला पुन्हा एकदा सुन्न केले आहे.

ओडिशातही जातीय जमावशाही?

ओडिशा राज्यात यापूर्वी अशा प्रकारच्या घटना तुलनेने कमी घडत होत्या. मात्र २०२४ मध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता राज्यात आल्यापासून वातावरणात बदल झाल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः गंजाम जिल्ह्यात भाजपने दोन्ही लोकसभा मतदारसंघ आणि बहुतेक विधानसभा जागांवर विजय मिळवला. पण ही घटना काँग्रेसचे आमदार रमेश जेना यांच्या मतदारसंघात घडली आहे.

याआधीही गंजाम जिल्ह्यात गुन्हेगारीची वाढ

१५ जून रोजी गोपाळपूर बीच येथे एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना राष्ट्रीय स्तरावर गाजली होती. या प्रकरणी १० आरोपी अटकेत आहेत. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही स्वत:हून दखल घेत अहवाल मागवला होता. या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर अधिक सुरक्षा वाढवण्याचं राज्य सरकारने आश्वासन दिले होते.

 

 

दलित अत्याचार प्रकरणात पोलिस चौकशी सुरू

धर्मकोट येथील या अलीकडील दलित अत्याचार प्रकरणात दोनही पीडितांनी लेखी तक्रार दाखल केली असून सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, सामाजिक माध्यमांवर आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कठोर आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

सामाजिक चेतना आणि राजकीय भान यांचा कस लागणारी घटना

ही घटना केवळ दोन दलितांवरील अत्याचार नसून, संपूर्ण समाजाच्या समतेच्या मूल्यांवरील प्रश्नचिन्ह आहे. राज्य सरकारने आणि पोलिस प्रशासनाने यामध्ये त्वरित, कठोर आणि पारदर्शक कारवाई न केल्यास एक चुकीचा संदेश जाईल. ओडिशासारख्या तुलनेने शांत राज्यात अशी घटना ही जातीयतेच्या विषारी राजकारणाचे लक्षण मानली जाऊ शकते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!