उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीनं 8 वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. याबाबतचा व्हिडीओही या व्यक्तीनं बनवला होता.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीनं 8 वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. याबाबतचा व्हिडीओही या व्यक्तीनं बनवला होता. अशातच आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगानं केली आहे. यासोबतच या व्यक्तीनं ज्या पोलिंग बुथवर मतदानाचा हक्क बजावला होता, त्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, उत्तर प्रदेशच्या उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
व्हायरल व्हिडीओ प्रकरणाबाबत माहिती देताना उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितलं की, "घटनेचा एफआयआर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 171-एफ आणि 419, आरपी कायदा 951 च्या कलम 128, 132 आणि 136 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अनेक वेळा मतदान करताना दिसणारा व्यक्ती राजन सिंह, अनिल सिंह यांचा मुलगा असून, खिरिया पमरण गावातील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे."
व्हिडीओमध्ये काय दाखवलंय?
व्हिडीओमध्ये एक तरुण ईव्हीएमजवळ उभा आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण 8 वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल तर काहीतरी कारवाई करावी असं त्यांनी लिहिले आहे.