
Cough Syrup Sale Rules : देशभरात आता कफ सीरपसह वेगवेगळ्या प्रकारची औषधे खरेदी करण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागणार आहे. केंद्र सराकरने औषधांसंबंधित नियम, 1945 मध्ये बदल करत सीरप मेडिकल किंवा वैद्यकीय दुकानातून थेट काउंटवरुन विक्री करण्यावर बंदी घातली आहे. याआधी ओव्हर द काउंटर म्हणजेच चिठ्ठी न दाखवता औषधे खरेदी करता येत होती. पण नवे नियम लागू झाल्यानंतर मेडिकलमधून सीरप खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचा शिक्का असणारी चिठ्ठी तुमच्यासोबत असणे अनिवार्य असणार आहे. तरच तुम्हाला औषधे खरेदी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने 9 जून 2026 रोजी एक सूचना जाहीर करत म्हटले की, औषधांच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहे. यानुसार औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 च्या कलम 12 आणि कलम 33 अंतर्गत नियमांत काही बदल केले आहेत.
सरकारने औषधांच्या नियमातील 1954 मधील Schedule K यादीमधील औषधांच्या श्रेणीमधून 'सीरप' (Syrup) शब्द हटवला आहे. यामुळे आता सीरप तुम्हाला डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करता येणार नाहीये. याशिवाय सीरपच्या विक्रीवरही कठोर नियम लागू असणार आहेत.
नव्या नियमांनुसार, कफ सीरपसह एखाद्या अन्य आजारावरील औषधांचे सीरप खरेदी करण्यासाठी व्यक्तीला रजिस्टर्ड डॉक्टरांनी दिलेली औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) दाखवावी लागणार आहे. या नव्या नियमामुळे चिठ्ठी न दाखवता विक्री-खरेदी करणाऱ्या सीरपवर चाप लागणार आहे.
सरकारने सीरपच्या नियमांमधील बदलाचा निर्णय अशावेळी घेतला आहे जेव्हा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये नित्कृष्ट दर्जाच्या कफ सीरपचे सेवन केल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला होता. याशिवाय औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. या घटनांनंतर सीरप तयार करणे आणि त्याच्या विक्रीवर कठोर नियम लागू करण्याची मागणी केली जात होती.