
२०२६ च्या बर्लिन मॅरेथॉनमध्ये एका चिनी फिटनेस इन्फ्लुएन्सरला अपात्र ठरवण्यात आलं आहे. ४२.२ किलोमीटरच्या या शर्यतीत तिने चक्क सायकलवरून लिफ्ट घेतल्याचे फोटोंमधून समोर आले आहे. या वादानंतर तिला मोठा फटका बसला असून, स्पोर्ट्सवेअर ब्रँड 'ब्रूक्स' (Brooks) ने तिच्यासोबतचा स्पॉन्सरशिप करारही मोडला आहे.
इन्स्टाग्रामवर संशयास्पद शर्यतींवर लक्ष ठेवणारे अकाउंट 'ऑफिशियल मॅरेथॉन टाइम इंटिग्रिटी युनिट' (OMTIU) ने २७ सप्टेंबरच्या या इव्हेंटचे काही फोटो शेअर केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १ ऑक्टोबरला केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी निदर्शनास आणून दिले की, ३५ ते ४० किलोमीटरच्या टप्प्यात तिने सर्वात कमी वेळ नोंदवला होता आणि नेमक्या याच वेळी ती "एका सायकलच्या मागे बसलेली दिसली होती."
फोटोंमध्ये दिसणारा रेस बिब चीनच्या युआनयुआन सन (Yuanyuan Sun) हिच्या नावावर नोंदणीकृत होता. तिने सुरुवातीला ४:५३:४६ या अधिकृत वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली होती. पण, बुधवारी सकाळपर्यंत तिचे निकाल अपडेट करून तिला अपात्र ठरवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
सीबीसी न्यूजशी (CBC News) बोलताना OMTIU च्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा फोटो शर्यतीत भाग घेतलेल्या दुसऱ्या एका स्पर्धकाने काढला होता आणि तो संस्थेला पाठवला होता.
बर्लिन मॅरेथॉनच्या प्रवक्त्याने सीबीसी न्यूजला सांगितले की, "आम्ही कोणत्याही व्यक्तीवर किंवा विशिष्ट कारवाईवर सार्वजनिकपणे भाष्य करत नाही." पण त्यांनी स्पष्ट केले की, फसवणूक करणाऱ्या स्पर्धकांशी संपर्क साधून त्यांना अपात्र ठरवले जाते.
"प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करतो आणि गरज पडल्यास आणखी कडक निर्बंधही लादतो," असेही ते म्हणाले.
चीनमधील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडनोट' (Rednote) ज्याला 'शाओहोंगशू' (Xiaohongshu) म्हणूनही ओळखले जाते, त्यावर 'अबीर' (Abeeeer) या नावाने वावरणाऱ्या या इन्फ्लुएन्सरने शनिवारी तिच्या ५,२०,००० फॉलोअर्सची जाहीर माफी मागितली. तिने मॅरेथॉनचे नियम मोडल्याचे मान्य केले आणि हा आपला "प्रामाणिक माफीनामा" असल्याचे म्हटले.
आपल्या कृतीचे स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, शर्यतीदरम्यान तिची तब्येत बिघडली होती. पण, तब्येत खराब असली तरी शॉर्टकट घेणे योग्य नव्हते, हे तिने मान्य केले.
"शॉर्टकट घेण्याची माझी कृती मॅरेथॉनच्या भावनेचा अपमान करणारी होती," असे तिने चिनी भाषेत लिहिले. "शर्यतीनंतर मी जेव्हा माझा अनुभव शेअर केला, तेव्हा मी ही गोष्ट मुद्दाम लपवली. हा खरोखरच एक अप्रामाणिकपणा होता."
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या इन्फ्लुएन्सरने याआधी मॅरेथॉनमध्ये आपली 'पर्सनल बेस्ट' (PB) वेळ नोंदवल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. पण आता त्या पोस्ट डिलीट करण्यात आल्या असून, बर्लिन मॅरेथॉनशी संबंधित फक्त तिचा माफीनामाच अकाउंटवर उरला आहे.
या घटनेचे पडसाद फक्त शर्यतीच्या निकालापुरते मर्यादित राहिले नाहीत. स्पोर्ट्सवेअर कंपनी ब्रूक्सने या घटनेनंतर इन्फ्लुएन्सरला स्पॉन्सरशिपमधून काढून टाकल्याचे निश्चित केले.
मंगळवारी सीबीसी न्यूजला दिलेल्या निवेदनात ब्रूक्सने म्हटले की, "ब्रूक्स चायनाशी संबंधित व्यक्ती आणि २०२६ च्या बर्लिन मॅरेथॉनमधील या प्रकरणाची आम्हाला माहिती मिळाली आहे."
"तथ्यांची पडताळणी केल्यानंतर, ब्रूक्स चायनाने या व्यक्तीसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत," असे ब्रूक्सने मंगळवारी सीबीसी न्यूजला सांगितले. "धावणे हे प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि स्पर्धेच्या आदरावर आधारित असले पाहिजे, यावर ब्रूक्सचा विश्वास आहे."
२०२६ च्या बर्लिन मॅरेथॉनमध्ये १६२ देशांमधील ५६,००० हून अधिक धावपटूंनी नोंदणी केली होती. 'अॅबॉट वर्ल्ड मॅरेथॉन मेजर्स' (Abbott World Marathon Majors) मधील सर्वात सपाट मार्ग म्हणून ओळखला जाणारा हा इव्हेंट जगातील सर्वात वेगवान मॅरेथॉन ट्रॅकपैकी एक मानला जातो. या शर्यतीत सुमारे ५०,००० स्पर्धकांनी अंतिम रेषा ओलांडली.
यावर्षी इतर कोणत्याही धावपटूंनी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, शॉर्टकट मारणे आणि मॅरेथॉनमध्ये फसवणूक करण्याचे इतर प्रकार या खेळात नेहमीच वादाचा विषय ठरले आहेत.
यातील सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे रोझी रुईझ (Rosie Ruiz) हिचे. १९८० च्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये महिलांमध्ये तिने सर्वात आधी अंतिम रेषा ओलांडली होती. तिला विजेतेपदाचा मुकुटही घालण्यात आला, पण ती अजिबात थकलेली दिसत नसल्याने अनेकांनी तिच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला.
नंतरच्या चौकशीत असे उघड झाले की, रुईझ शर्यतीच्या अगदी शेवटी सामील झाली होती आणि तिने फक्त शेवटचा एक मैलच धावून पूर्ण केला होता. १९७९ च्या न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्येही तिने बहुतांश अंतर सबवे (ट्रेन) ने पार करून बोस्टनसाठी पात्रता मिळवली होती.
२०११ मध्ये आणखी एक मोठे प्रकरण समोर आले. युनायटेड किंगडममधील कठीण अशा किल्डर मॅरेथॉनमध्ये (Kielder Marathon) रॉब स्लोन (Rob Sloan) तिसऱ्या क्रमांकावर आला होता. पण, त्याने शर्यतीचा काही भाग बसने पार केल्याचे नंतर उघडकीस आले.
२०२३ मध्ये, स्कॉटिश अल्ट्रा-मॅरेथॉन धावपटू जोआसिया झकझेव्स्की (Joasia Zakrzewski) हिने ५० मैलांच्या शर्यतीत मिळवलेले तिसरे स्थान गमावले. तिने मार्गाचा काही भाग कारने पार केल्याचे उघड झाल्यानंतर तिच्यावर ही कारवाई झाली.
त्याच वर्षी, मेक्सिको सिटी मॅरेथॉनने शॉर्टकट मारल्याबद्दल तब्बल ११,००० धावपटूंना अपात्र ठरवले होते. काही स्पर्धकांनी शर्यतीचा मार्ग पूर्ण करण्यासाठी कार, सायकली आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याचा आरोप होता.