सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा अध्यक्ष पुढील फेब्रुवारीच्या अखेरीस निवडला जाईल, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आहे.
नवी दिल्ली : सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा अध्यक्ष पुढील फेब्रुवारीच्या अखेरीस निवडला जाईल, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आहे. भाजपच्या नियमानुसार, पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड होण्यापूर्वी निम्म्या राज्यांमध्ये निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजेत.
अशातच, ६०% भाजप राज्य घटकांच्या अध्यक्षांचा कार्यकाळ आधीच संपला असून, जानेवारीच्या मध्यात त्या जागी नवीन नेमणुका केल्या जातील. त्यानंतर पक्षाध्यक्षाची नियुक्ती होईल, असे ते म्हणाले. सध्याचे केंद्रीय मंत्रीच अध्यक्ष होतील का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, 'अद्याप काहीही निश्चित नाही' असे सांगितले. सध्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा २०२० पासून या पदावर आहेत.
स्पर्धेत कोण?: दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल हे भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले प्रमुख नेते आहेत.
एकच निवडणूक विधेयक मांडणी: लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'एक देश, एक निवडणूक' याबाबत २ घटनादुरुस्ती विधेयके मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आली. यावर सुरू झालेली चर्चा अपूर्ण राहिली असून, सरकारने हे विधेयक तातडीने मंजूर करण्याऐवजी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्याचा मानस व्यक्त केला आहे. बुधवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून त्यानंतर जेपीसीची स्थापना होईल. जेपीसीमध्ये ३१ खासदार (२१ लोकसभा, १० राज्यसभा) असतील आणि भाजपचाच अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. ९० दिवसांत या समितीने अहवाल द्यायचा आहे.
हे विधेयक अनावश्यक निवडणूक खर्च टाळण्यासाठी आणि आचारसंहितेमुळे होणारे विकासकामांना खीळ बसण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे संविधानाचे कोणतेही नुकसान होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, विधेयकाचा विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांनी हे संविधानविरोधी असल्याचे म्हटले असून, ते संघराज्य पद्धतीविरुद्ध असल्याचा आरोप केला आहे. तसेच मसुदा अहवाल जेपीसीकडे सोपवण्याची मागणी केली आहे.