
मुंबई : भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १२ ऑक्टोबर रोजी दिल्लीत एका आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या गरोदर महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा दावा भाजपने केलाय. या धक्काबुक्कीत महिला पत्रकार जमिनीवर पडली आणि तिला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी, दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष राजेश भाटिया आणि भाजप आमदार उमंग बजाज यांनी हे आरोप केले आहेत. या दाव्यांनंतर आता पत्रकारांना मिळणारी वागणूक आणि लोकप्रतिनिधींचे वर्तन यावरून राजकीय वर्तुळात मोठी खडाजंगी सुरू झाली आहे.
एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना प्रदीप भंडारी यांनी लिहिले की, "३ महिन्यांची गरोदर असलेली महिला पत्रकार रिचा पराशर आंदोलनाचे कव्हरेज करत असताना राहुल गांधींनी तिला मारहाण केली! या महिला पत्रकाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिने हा भयानक प्रसंग सांगितला आहे!"
भाजप प्रवक्ते पुढे म्हणाले, "राहुल गांधी किती मोठे गुंड आहेत आणि त्यांची 'पितृसत्ता मोडून काढा' ही घोषणा किती पोकळ आहे, हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हा भयानक प्रसंग ऐकायला हवा."
3 month pregnant Female journalist Richa Parashar was thrashed by Rahul Gandhi when she was covering her protest!
Female journalist is admitted in the hospital, and she recounts the horrror!
Every person should listen to this horror to know how big a goon Rahul Gandhi is& how hollow is his slogan Smash The Patriachy!
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) October 12, 2026
या घटनेनंतर काँग्रेसचा एकही कार्यकर्ता त्या महिला पत्रकाराच्या मदतीला पुढे आला नाही, उलट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावरच चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही भंडारी यांनी केला.
"'पितृसत्ता मोडून काढण्यावर' बोलणारे राहुल गांधी आज एखाद्या गुंडासारखे वागले. त्यांनी स्वतःचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना कसे मागे ढकलले, हे तुम्ही पाहिले असेलच. ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना कोपरखळी मारतात. आता त्यांनी ज्या प्रकारे एका महिला पत्रकाराला धक्काबुक्की केली, त्यावरून हे स्पष्ट होते की राहुल गांधींच्या रोमरोमात या देशातील लोकशाही आणि महिलांबद्दल फक्त द्वेष भरलेला आहे," असे भंडारी म्हणाले.
एका युजरने म्हटले आहे की, "एका गरोदर पत्रकाराला एवढ्या मोठ्या गर्दीत का पाठवण्यात आले? तिला आयटी सेल चालवण्यासारखे डेस्क जॉब द्यायला हवे होते." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "एवढ्या मोठ्या आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी एका गरोदर महिलेला सांगण्याची ही वेळ आहे का... तिचे बॉस किती अमानुष असू शकतात..."
तिसऱ्या युजरने म्हटले, "सर, कृपया थोडे चांगले काम करा, खोटे दावे करण्यासाठीही यापेक्षा चांगल्या कल्पकतेची गरज असते. तुमच्या स्क्रिप्ट रायटरला कामावरून काढून टाका." चौथ्या युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "एवढ्या मोठ्या गर्दीच्या आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी गरोदर महिलेला पाठवणाऱ्या बॉस किंवा संपादकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा. हा निर्णय कोणी घेतला आणि तिच्या सुरक्षेला प्राधान्य का दिले नाही? तिचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना जबाबदार धरलेच पाहिजे."