
Bihar Teachers Arrested For Drinking On School Trip To Nepal: ज्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि मार्गदर्शनाची जबाबदारी होती, तेच पाच सरकारी शिक्षक एका शैक्षणिक सहलीदरम्यान मोठ्या अडचणीत सापडले आहेत. बिहारच्या सुपौल जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर या शिक्षकांना दारूच्या नशेत पकडण्यात आलं. ही घटना शुक्रवारी भीमनगर चेकपॉईंटवर घडली. 'मुख्यमंत्री बिहार दर्शन योजने'अंतर्गत हे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन नेपाळहून परतत होते. त्यावेळी अधिकाऱ्यांना त्यांच्या वागणुकीचा संशय आला. ब्रेथ-ॲनालायझरने तपासणी केली असता, पाचही जण दारूच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं.
जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय प्रियदर्शी यांनी सांगितलं, “जेव्हा आम्ही शिक्षकांची तपासणी केली आणि ब्रेथ-ॲनालायझर मशीन वापरली, तेव्हा मशीनचे रीडिंग पाहून आम्हाला धक्काच बसला. पाचही शिक्षक दारूच्या नशेत होते.”
अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावंही समोर आली आहेत. यामध्ये मधेपुराच्या कुमारखंड ब्लॉकमधील उत्क्रमित मध्य विद्यालय परिहारीचे दीपनारायण राम, इंग्लिश कुमार आणि धीरेंद्र कुमार यांचा समावेश आहे. तर खगडियातील एका माध्यमिक शाळेतील सिवांश कुमार उर्फ शक्ती शमन आणि मिठू कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे.
या सर्व आरोपी शिक्षकांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासनात संतापाची लाट उसळली असून, अशा अधिकृत सहलींदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
प्रियदर्शी यांनी शिक्षकांच्या या वागणुकीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “अटक केलेल्या शिक्षकांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मुलांना ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती देण्याऐवजी, या शिक्षकांनी नेपाळमध्ये जाऊन दारू ढोसली आणि त्याच नशेत मुलांसोबत प्रवास करत होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.”
सुपौलचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या प्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले असून, निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे, मधेपुराचे जिल्हाधिकारी अभिषेक रंजन यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
मधेपुरा जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या शिक्षकांवर केवळ दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार नाही, तर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची कारवाई देखील होऊ शकते.”