
Bihar Election 2025 Result : बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. भाजपने ९५ जागा जिंकून एक नंबरचा पक्ष झाला आहे. एनडीए २०६ आणि महाविकास आघाडी ३० जागा जिंकल्या आहेत. इतर जागा ७ जिंकल्या असून भाजपच्या कार्यालयात संध्याकाळी जल्लोष केला जाणार आहे. त्यामुळं येथे एनडीएच सरकार स्थापन केलं जाणार आहे.
पटना येथील ताज्या माहितीनुसार, २०२५ च्या विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये एनडीएने २०६ जागांवर आघाडी घेतली आहे. २०० पेक्षा अधिक जागांचा हा आकडा एनडीएसाठी ऐतिहासिक ठरला आहे; यापूर्वी २०१० मध्ये त्यांनी २०६ जागा जिंकून असाच मोठा विजय नोंदवला होता. यावेळी भाजप आणि जनता दल (युनायटेड) या दोन्ही घटक पक्षांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगली दिसत आहे.
भाजप: ९५ जागांवर आघाडी
जदयू: ८२ जागांवर आघाडी
लोजपा, हम आणि आरएलएम: उर्वरित ३१ जागांवर आघाडी
दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) २५ जागांवर, काँग्रेस ३आहेत, ज्यामुळे ते बहुमताच्या आकड्यापासून खूप दूर असल्याचे दिसत आहे.
ही निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी एक अग्निपरीक्षा मानली जात होती. बदलत्या राजकीय युत्या, त्यांच्यावरील 'थकव्याचे' आरोप आणि विरोधकांचे तीव्र हल्ले त्यांना सहन करावे लागले. मात्र, आजच्या कलांनी हे पुन्हा सिद्ध केले आहे की, बिहारच्या सामान्य जनतेमध्ये त्यांच्या नेतृत्वाची पकड आजही मजबूत आहे. 'सुशासन बाबू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीश कुमारांनी राज्याला 'जंगलराज'च्या प्रतिमेतून बाहेर काढण्याचे जे कार्य केले, त्याला जनतेने पुन्हा एकदा स्वीकारले आहे.
या निवडणुकीत भाजप-जदयू युती अधिक मजबूत आणि एकसंध दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशव्यापी लोकप्रियता आणि नितीश कुमार यांचा बिहारमधील जमिनीवरील अनुभव व जातीय समीकरणांची जाण, या संयोगाने आघाडीला मोठे यश मिळवून दिले. विकास, कायद्याचे राज्य, महिला सुरक्षा, सामाजिक न्याय आणि सरकारी योजनांचा थेट लाभ या मुद्द्यांना प्रचारात अग्रस्थानी ठेवून एनडीएने जनतेसमोर स्थिरतेचा पर्याय ठेवला आणि मतदारांनी त्यालाच पसंती दिली.
एनडीएने या निकालांच्या माध्यमातून राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या सुधारणेचाही मोठा दावा केला आहे. दशकांपासून बिहारमधील निवडणुका हिंसाचार, धमक्या आणि पुनर्मतदानासाठी ओळखल्या जात होत्या:
१९८५, १९९०, १९९५ आणि २००५ च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि शेकडो बूथवर पुनर्मतदान झाले होते.
मात्र, २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत पुनर्मतदान नाही आणि मोठा हिंसाचार नाही. एनडीए नेते याला उत्कृष्ट कायदा-सुव्यवस्थेचे आणि शांततापूर्ण प्रशासनाचे यश मानत आहेत.
२०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका असोत, किंवा २०२० आणि आता २०२५ च्या विधानसभा निवडणुका—बिहारमधील जनतेने एक स्पष्ट पॅटर्न दाखवला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा मतदारांचा स्पष्ट संदेश आहे: विकास हवा आहे, अस्थिरता नको आहे. यामुळे, एनडीएने केवळ निवडणूक जिंकली नाही, तर बिहारच्या राजकीय भविष्याची नवी दिशा निश्चित केली आहे.
राज्यभरातील 46 मतमोजणी केंद्रांवर 2600 हून अधिक उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पहिला स्तर केंद्रीय निमलष्करी दल (CISF, CRPF), दुसरा बिहार स्पेशल आर्म्ड पोलीस आणि तिसरा जिल्हा पोलीस दल सांभाळणार आहे. सर्व स्ट्रॉन्ग रूम 24 तास CCTV च्या निगराणीखाली आहेत. सर्व उमेदवारांना लाइव्ह CCTV फीड उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात 67.13% मतदान झालं होतं, जे बिहारच्या निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.
11 वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत, त्यापैकी 10 संस्थांनी NDA ला बहुमताच्या दिशेने आघाडी दाखवली आहे. Axis My India सर्वेक्षणानुसार, NDA ला 121-141 जागा आणि महाआघाडीला 98-118 जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री पदासाठी 34% लोकांनी तेजस्वी यादव यांना पहिली पसंती दिली आहे. मतांच्या टक्केवारीनुसार, NDA ला 43% आणि महाआघाडीला 41% मतं मिळण्याचा अंदाज आहे. जन सुराज पक्षाला सुमारे 4% मतं मिळण्याची शक्यता आहे, पण जागा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
14 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता आधी पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. 30 मिनिटांनंतर EVM मतमोजणी सुरू होईल. एकूण 4,372 टेबलांवर सुमारे 5 कोटी मतांची मोजणी केली जाईल. सर्व केंद्रांवर उमेदवारांचे एजंट आणि निवडणूक निरीक्षक उपस्थित राहतील.
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ यंदा अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरली आहे. या निवडणुकीत विक्रमी मतदानाची नोंद झाली असून, आज निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात राजकारणातील अनुभवी दिग्गजांसोबतच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील तारे, प्रसिद्ध लोकगायिका आणि ‘आसामचा सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे माजी आयपीएस अधिकारी देखील उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या सेलिब्रिटी आणि त्यांच्या हाय-प्रोफाइल लढतींच्या निकालाकडे लागले आहे.
महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार तेजस्वी यादव हे राघोपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१५ आणि २०२० मध्ये विजय मिळवलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचा थेट मुकाबला भाजपचे सतीश कुमार यादव यांच्याशी आहे. विशेष म्हणजे २०१० मध्ये याच जागेवर सतीश यादव यांनी तेजस्वी यांच्या आई राबडी देवी यांचा पराभव केला होता. यादव आणि मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने ही जागा कायमच चर्चेत असते.
भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव हे या निवडणुकीतील सर्वात चर्चेत असलेले व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. राजदच्या तिकिटावर छपरा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे ३९ वर्षीय खेसारी यांनी विजय मिळवल्यास, भोजपुरी चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित होईल. कारण, रवी किशन, मनोज तिवारी आणि निरहुआ यांसारख्या सुपरस्टार्सना त्यांचा पहिला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. खेसारींच्या सभांना जबरदस्त गर्दी पाहायला मिळाली होती.
प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर (२५ वर्षीय) या अलीनगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत आहेत. मिथिला क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या मैथिली यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पाठबळ मिळाले आहे. शास्त्रीय आणि लोकसंगीतातील या प्रतिभावान गायिकेच्या उमेदवारीने अलीनगरची लढत अधिक रंजक बनवली आहे.
मोकामा मतदारसंघातील लढत सर्वात वादग्रस्त आणि हाय-व्होल्टेज ठरली आहे, जिथे दोन बाहुबली कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खुनाच्या आरोपात तुरुंगात असलेले बाहुबली अनंत सिंह ('छोटे सरकार') हे जेडीयूच्या तिकिटावर लढत आहेत. गेल्या २० वर्षांपासून मोकामावर त्यांचे वर्चस्व आहे. मात्र, यावेळी त्यांचा थेट सामना राजदकडून निवडणूक लढवणाऱ्या माजी खासदार वीणा देवी यांच्याशी आहे, ज्या बाहुबली सूरजभान सिंह यांच्या पत्नी आहेत. २५ वर्षांनंतर हे दोन बाहुबली परिवार मोकामात आमनेसामने आल्याने ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे.
बक्सर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले आनंद मिश्रा हे माजी आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांना 'आसामचा सिंघम' म्हणून ओळखले जाते. अंमली पदार्थांच्या माफियांवर कठोर कारवाई केल्यामुळे तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले मिश्रा यांनी २०२४ मध्ये राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. विकास, शिक्षण आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर जोर देत, बक्सरला 'सुवर्ण भविष्य' देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
तेज प्रताप यादव (महुआ): तेजस्वी यांचे मोठे बंधू असून, त्यांनी स्वतःचा 'जनशक्ती जनता दल' (JJD) हा पक्ष स्थापन करून महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
सम्राट चौधरी (तारापूर): उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते, १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
रेणु देवी (बेतिया): ६६ वर्षीय दिग्गज नेत्या आणि बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री (२०२०-२०२२) राहिलेल्या रेणु देवी बेतियातून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.
शिवानी शुक्ला (लालगंज): लंडनहून एलएलएमची पदवी घेऊन परतलेल्या शिवानी यांनी राजदच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. तुरुंगात असलेल्या आपल्या वडिलांना (मुन्ना शुक्ला) 'आजाद' करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
बिजेंद्र प्रसाद यादव (सुपौल): जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि ऊर्जामंत्री असलेले बिजेंद्र प्रसाद यादव १९९० पासून सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत, जो एक विक्रम आहे.
रितु जयस्वाल (परिहार): पंचायत स्तरावरच्या कामामुळे 'मुखिया दीदी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रितु जयस्वाल यांनी पक्षामार्फत तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ही जागा लक्षवेधी बनवली आहे.
या निवडणुकीतील निकालांमुळे राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.