
Bhopal Model Khushboo Ahirwar Found Dead : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मॉडेल खुशबू अहिरवारचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. तरुणीच्या गुप्तांगासह खांद्यावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. कुटुंबीयांनी कासिम नावाच्या तरुणावर मुलीच्या हत्येचा आरोप केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
सोमवारी पहाटे इंदूर रोडवरील भैसाखेडी येथील एका रुग्णालयात मॉडेलचा मृतदेह आढळला. एक तरुण तिला रुग्णालयात सोडून पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर डॉक्टरांनी मुलीच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. खुशबूच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी याला लव्ह जिहाद आणि हत्या म्हटले आहे. तर, शवविच्छेदन अहवालानंतरच खुशबूचा मृत्यू नेमका कसा झाला हे सांगता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्या की नैसर्गिक मृत्यू, हे तपासानंतर स्पष्ट होईल. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
खुशबूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कासिम अहमदने त्यांच्या मुलीची हत्या केली आहे. त्यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचे प्रकरणही म्हटले आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, कासिम काही काळापूर्वी त्यांच्या मुलीला भेटला होता, पहिल्या भेटीत त्याने आपले नाव राहुल सांगितले होते. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि ते एकमेकांना भेटू लागले. मृतकाच्या आईने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी कासिमचा फोन आला होता, त्याने सांगितले की, 'मी मुस्लिम आहे, पण तुमची मुलगी माझ्यासोबत आहे. मी तिला घेऊन उज्जैनला जात आहे, तुम्ही काळजी करू नका.' तेव्हा आम्हाला समजले की आमची मुलगी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यानंतर त्याने तिला रुग्णालयात नेऊन तिची हत्या केली. खुशबूच्या आईचे म्हणणे आहे की, मुलीच्या शरीरावर आणि गुप्तांगावर ज्या प्रकारे जखमेच्या खुणा आहेत, त्यावरून आरोपीने तिला मारहाण करून ठार मारल्याचे स्पष्ट होते. आता कासिम आजारपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे खोटे बोलत आहे. आम्हाला न्याय हवा आहे, मुलीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
मॉडेल खुशबू अहिरवार सोशल मीडियावर सक्रिय होती, ती मॉडेलिंग करायची. तिने अनेक स्थानिक ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते. तिने इंस्टाग्रामवर 'डायमंड गर्ल' नावाने अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटवर खुशबू तिचे फोटो शेअर करायची. तिचे इंस्टाग्रामवर १२ हजार फॉलोअर्स आहेत. तिने बीए प्रथम वर्षानंतर शिक्षण सोडले होते. खुशबू अहिरवार उर्फ खुशी वर्मा (२७) ही कासिम नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.