Rapido Accident : रॅपिडो बाईक अपघातात तरुणी गंभीर, ऑपरेशनसाठी २० लाखांचा खर्च; कंपनीने फिरवली पाठ

Published : Aug 06, 2026, 01:51 PM IST
Rapido Accident : रॅपिडो बाईक अपघातात तरुणी गंभीर, ऑपरेशनसाठी २० लाखांचा खर्च; कंपनीने फिरवली पाठ

सार

Rapido Accident Woman Injured : बेंगळुरूमध्ये एका इंटीरियर डिझायनर तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. रॅपिडो बाईक टॅक्सीच्या अपघातात ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर २० लाखांपेक्षा जास्त खर्चाचा डोंगर उभा राहिला आहे. रायडरच्या चुकीमुळे हा अपघात झाला आणि आता कंपनीने मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

बेंगळुरू : बेंगळुरूमधील एका इंटीरियर डिझायनरने रॅपिडो कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. एका भीषण बाईक टॅक्सी अपघातानंतर कंपनीने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचं तिचं म्हणणं आहे. या अपघातात तिला जीवघेण्या जखमा झाल्या असून उपचारांवर २० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. सानी कृष्णा (३२) असं या केरळच्या इंटीरियर डिझायनरचं नाव आहे. तिने एका व्हायरल व्हिडिओमध्ये तिच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. १७ जून रोजी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी तिने रॅपिडो बाईक बुक केली होती, पण हा प्रवास तिच्यासाठी भयानक आठवण ठरला.

सानीने सांगितलं की, तिने सकाळी तिच्या बायरासांद्रा येथील घरातून डोमलूरमधील ऑफिसला जाण्यासाठी राईड बुक केली होती. प्रवास सुरू होऊन एक किलोमीटरपेक्षा कमी अंतर झालं असेल, तेवढ्यात रॅपिडो रायडरने एका ट्रॅक्टरला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात झाला. या अपघातात सानी रस्त्यावर फेकली गेली आणि तिच्यावरून ट्रॅक्टर गेला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर तिला आधी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण नंतर बेंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथे तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. पुढील उपचारांसाठी आणि रिकव्हरीसाठी तिला केरळमधील कोझिकोड येथील मित्रास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

या अपघातात सानीच्या अनेक बरगड्यांना फ्रॅक्चर झालं, खांदा मोडला, चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या ज्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करावी लागली. तसेच, तिच्या लिव्हरला मोठी इजा झाली, एक फुफ्फुस निकामी झालं आणि स्प्लीन (प्लीहा) काढण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. अपघातानंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही ती अंथरुणाला खिळून आहे आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) साठी तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सानीच्या म्हणण्यानुसार, तिच्या उपचारांचा खर्च आतापर्यंत २० लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. तिचा चुलत भाऊ अद्वैत पी. याने सांगितलं की, कुटुंबाचा एकूण खर्च २५ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे आणि तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने रॅपिडोवर आरोप केला आहे की, कंपनी महिलांच्या सुरक्षेची मोठी जाहिरात करते, पण तिच्या बाबतीत मात्र कंपनीने पूर्णपणे पाठ फिरवली.

व्हायरल व्हिडिओ पाहा

 

 

व्हिडिओवर रॅपिडोची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हे प्रकरण गाजल्यानंतर रॅपिडो कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीने म्हटलं की, "आम्ही पीडितेच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि त्यांना शक्य ती सर्व मदत आणि सहकार्य मिळेल याची खात्री करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत जवळून काम करत राहू."

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tarun Tejpal Case : तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; दोषमुक्तीचा निकाल रद्द
Gold-Silver Price : सोनं-चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव