२ कोटींचं पॅकेज, भारी नोकरी... सगळं सोडून कॉन्टेंट क्रिएटर बनली बंगळूरची तरुणी!

Published : Mar 13, 2026, 03:11 PM IST
Bengaluru Techie Quits 2 Crore Google Job to Become Full Time Content Creator

सार

Bengaluru Techie Quits 2 Crore Google Job to Become Full Time Content Creator: सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी बंगळूरमधील एका ३५ वर्षीय तरुणीने गुगलमधील तब्बल २ कोटी रुपयांची नोकरी सोडली आहे. तिच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी २ कोटींच्या पॅकेजवर पाणी

आजकाल सोशल मीडिया आणि कॉन्टेंट क्रिएटर्सचा जमाना आहे. अनेकजण यालाच आपलं करिअर बनवू पाहत आहेत. कुणा बॉसची ऑर्डर नाही, आपणच आपले बॉस, असं हे काम अनेकांना आकर्षित करतंय. रोज-रोज ऑफिसला जाऊन तेच तेच काम करण्यापेक्षा काहीतरी नवीन करावं, असं अनेकांना वाटतं. त्यामुळेच कॉन्टेंट क्रिएटर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचं वेड वाढलंय. पण हे वेड इतकं वाढलंय की, गुगलसारख्या कंपनीतली २ कोटी रुपयांची नोकरी सोडायलाही लोक तयार होत आहेत. यावरूनच सोशल मीडियाच्या क्रेझचा अंदाज येतो.

हो, हे खरं आहे. सोशल मीडियावर फुल-टाईम इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी बंगळूरमधील एका ३५ वर्षीय टेकीने गुगलमधील तब्बल २ कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली आहे. तिच्या या निर्णयाने सगळेच हैराण झाले आहेत. गुगलमध्ये नोकरी मिळणं हे अनेकांसाठी एक स्वप्न असतं. तिथे मिळणाऱ्या सुविधा आणि पगारामुळे अनेकजण गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. पण या तरुणीने मात्र सोशल मीडियासाठी इतकी मोठी नोकरी सोडून दिली.

गुगलमधील १० वर्षांच्या करिअरला गुडबाय

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी नोकरी सोडलेल्या या तरुणीचं नाव श्रीगीता श्रीनिवास आहे. बंगळूरची रहिवासी असलेली श्रीगीता गुगलमध्ये प्रिन्सिपल अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करत होती. तब्बल १० वर्षं गुगलमध्ये काम केल्यानंतर डिसेंबर महिन्यात तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. या काळात तिने हैदराबाद आणि आयर्लंडमधील डब्लिन इथेही काम केलं. डब्लिनमध्ये असताना ती गुगलच्या एका मोठ्या युरोपियन फॅशन क्लायंटचं काम सांभाळत होती.

नोकरी सोडण्याच्या निर्णयाबद्दल तिने एक व्हिडिओ बनवला. त्यात ती म्हणते, "मला अजून सगळं काही कळलेलं नाही आणि माझा पुढचा पगार कुठून येणार आहे, हेही मला माहीत नाही." हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर तिचे फॉलोअर्स ९०० वरून थेट ३००० वर पोहोचले. एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, “हा निर्णय एका रात्रीत घेतलेला नाही. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. मला फक्त आर्थिक सुरक्षा पुरेशी नाही, तर त्यापलीकडे जाऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे.”

कॉन्टेंट क्रिएशनचा निर्णय अचानक घेतलेला नाही. श्रीगीता गेल्या पाच वर्षांपासून तिच्या कॉर्पोरेट नोकरीसोबतच ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईलवर कॉन्टेंट बनवत होती. आयर्लंडच्या 'वाइल्ड अटलांटिक वे'वर केलेल्या एका प्रवासानंतर तिला आपलं पॅशन कळालं. ती म्हणते, "माझा हा विचार माझ्या कौटुंबिक संस्कारांच्या अगदी विरुद्ध होता. कारण आपल्या भारतीय घरांमध्ये नेहमी कंपनीचा सीईओ होण्याचं स्वप्न दाखवलं जातं. कुटुंबासाठी तेच यश असतं." आता श्रीगीता गुगलची नोकरी सोडल्यानंतर आयुष्य नव्याने कसं उभं करायचं, यावर व्हिडिओ बनवत आहे.

तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Post: मजुराने परत केले ६ हजारांचे पाकीट, प्रामाणिकपणाने जिंकली मने
5 Thousand to farmer | शेतकऱ्यांना दुष्काळाच्या 12 सवलती, 5 हजार मदत Devendra Fadanvis