
बंगळुरूच्या एका शिक्षकाने केमिस्ट्रीचा क्लास चक्क गाण्या-बजावण्याचा कार्यक्रम करून टाकला. मुलांना रासायनिक मूलद्रव्यांची अवघड पीरियोडिक टेबल (आवर्त सारणी) लक्षात ठेवता यावी, यासाठी त्यांनी एका लोकप्रिय बॉलिवूड गाण्याची मदत घेतली. या शिक्षकाचं नाव आहे आकाश स्वरूप. त्यांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात केमिस्ट्रीचा धडा कसा एका मजेशीर ॲक्टिव्हिटीमध्ये बदलला हे दिसतंय.
या व्हिडिओमध्ये आकाश वर्गातल्या फळ्यासमोर उभे आहेत. फळ्यावर पीरियोडिक टेबलमधली सगळी मूलद्रव्यं लिहिलेली दिसतात. त्यांच्या हातात एक पट्टी आहे आणि ते एका-एका मूलद्रव्यावर बोट ठेवून त्यांची नावं एका तालासुरात गात आहेत.
लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं की, शिक्षकांनी २०१२ साली आलेल्या 'अय्या' सिनेमातील 'ड्रीमम वेकअम' या गाण्याच्या चालीवर हा धडा बसवला होता. शिक्षक जसजसे गाणं गात पुढे जात होते, तसतसा कॅमेरा विद्यार्थ्यांकडे वळला. तेव्हा दिसलं की, विद्यार्थीसुद्धा आपल्या जागेवरच नाचत आणि गात या धड्यात सहभागी झाले होते.
बघता बघता संपूर्ण वर्गाचं एका छोट्या परफॉर्मन्समध्ये रूपांतर झालं. विद्यार्थी उत्साहाने यात सामील झाले होते. काही वेळानंतर तर शिक्षक आकाश स्वतः विद्यार्थ्यांसोबत उड्या मारत आणि नाचताना दिसले. जेवढी मजा विद्यार्थ्यांना येत होती, तेवढीच मजा ते स्वतःही घेत होते.
या क्रिएटिव्ह पद्धतीमुळे, जी पीरियोडिक टेबल लक्षात ठेवायला खूप अवघड वाटते, तीच गोष्ट अधिक सोपी आणि कायम लक्षात राहणारी बनली.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी शिक्षकाच्या या पद्धतीचं खूप कौतुक केलं. अनेकांनी म्हटलं की, अशा मनोरंजक पद्धतीने शिकवलेला धडा विद्यार्थी कधीच विसरणार नाहीत. तर काहींनी शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी बनवल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले.
एका युझरने तर गंमतीत कमेंट केली की, 'आकाश यांना डान्स टीचर व्हायचं होतं, पण ते चुकून केमिस्ट्रीचे शिक्षक झाले.' हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकजण शिक्षकाच्या या अनोख्या पद्धतीची प्रशंसा करत आहेत.