
बेंगळुरूच्या यशवंतपूर फ्लायओव्हरवर झालेल्या एका अपघाताच्या डॅशकॅम व्हिडिओमुळे रस्ते सुरक्षा, धोकादायक ओव्हरटेकिंग आणि हेल्मेटच्या महत्त्वावर चर्चा सुरू झाली आहे. रेडिटवर शेअर केलेल्या या व्हिडिओत एक दुचाकीस्वार रिक्षा आणि कारमधील अरुंद जागेतून गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, त्याचा तोल जातो आणि तो रस्त्यावर पडतो. त्याच्याकडील साहित्यही खाली पडते. तो थोडा घाबरलेला दिसला, पण सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. जवळच्या रिक्षाचालकांनी लगेच धाव घेत त्याला मदत केली.
इतर वाहनांच्या अगदी जवळून गाडी चालवणे, विशेषत: वळणांवर, किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. डॅशकॅम फुटेज शेअर करणाऱ्या व्यक्तीने वाहनचालकांना दोन वाहनांच्या मधून जाणे टाळण्याचे आवाहन केले आणि योग्य हेल्मेट घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रस्त्यावर समोरून कधी काय येईल, हे कुणालाच माहीत नसते, असेही त्याने नमूद केले.
ट्रॅफिकमधून गाडी काढणे आणि सुरक्षित अंतर न ठेवता ओव्हरटेक करण्याच्या धोक्यांकडे या डॅशकॅम फुटेजने लक्ष वेधले आहे. घटनाक्रम नेमका कसा घडला हे स्पष्ट नसले तरी, रेडिट युजर्समध्ये दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक यांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे.
अनेकांनी निदर्शनास आणून दिले की, त्या रस्त्यावर मोठे वळण आहे, त्यामुळे ओव्हरटेक करणे अधिक धोकादायक ठरते. वाहनांची अचानक हालचाल, खड्डे आणि सुरक्षित अंतराचा अभाव यामुळे अपघात कसे होऊ शकतात, याकडे काहींनी लक्ष वेधले.
या व्हिडिओमुळे रेडिट युजर्समध्ये मोठी चर्चा रंगली. अपघाताचे नेमके कारण काय असावे, याबाबत अनेकांनी आपली मते मांडली. काहींनी वळणावर ओव्हरटेक करण्याच्या दुचाकीस्वाराच्या प्रयत्नाला दोष दिला, तर काहींच्या मते रिक्षाचालकाच्या वळण्यामुळेही ही घटना घडू शकते.
एका युजरने कमेंट केली: "त्याला वाटले तिथे वळण नाही आणि कार सरळ जाईल, म्हणूनच वळणांवर कधीही ओव्हरटेक करू नये."
दुसऱ्या युजरने लिहिले: “अगदी खरं आहे. रिक्षावाले इंडिकेटर न देता अचानक उजवीकडे वळतात, तर बाईकस्वार सुरक्षित अंतराचा विचार न करता छोट्याशा जागेतूनही गाडी काढण्याचा प्रयत्न करतात. वास्तवात पाहता, एका खड्ड्यामुळेही गाडी हलू शकते, आणि खूप जवळून गाडी चालवणाऱ्याचा तोल जाऊ शकतो. खरंतर, चूक दोघांचीही आहे, पण परिस्थितीचा अंदाज न घेता आणि सुरक्षित अंतर न ठेवता गाडी चालवणाऱ्या बाईकस्वाराची चूक जास्त आहे."
तिसऱ्या युजरने मत मांडले: “पुढे मोठं वळण आहे, म्हणूनच असं घडलं. बाईकवाल्याने रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि वळण पाहून रिक्षावाल्याने गाडी थोडी वळवली, बाईकवाला जवळ आहे याचा त्याला अंदाज आला नाही.”
गाडी चालवताना सुरक्षित अंतर ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याची आठवण यशवंतपूर फ्लायओव्हरवरील घटनेने करून दिली आहे. दोन वाहनांच्या मधून जाण्याच्या प्रयत्नात, जर दुसऱ्याने अचानक दिशा बदलली तर रिअॅक्ट व्हायला खूप कमी वेळ मिळतो.
वळण असलेल्या रस्त्यांवर जास्त काळजी घ्यावी लागते, कारण दृश्यमानता आणि वाहनांची हालचाल वेगाने बदलू शकते. योग्य आकाराचे आणि प्रमाणित हेल्मेट घालणे तितकेच महत्त्वाचे आहे, ज्यामुळे पडल्यावर डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी होऊ शकतो.
या घटनेने बेंगळुरूतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. जबाबदारीने गाडी चालवणे, योग्य सिग्नल देणे आणि सर्व वाहनचालकांमध्ये अधिक जागरूकता असण्याची गरज सोशल मीडिया युजर्सनी व्यक्त केली आहे.