
Bengaluru Actress and Lover Arrested for Murder : बंगळुरूच्या वायव्य भागात असलेल्या विजयलक्ष्मी लेआऊटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका २९ वर्षांच्या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. मृताची लिव्ह-इन पार्टनर उर्वशी उर्फ बिंदू (२६), तिचा प्रियकर विनय कुमार (२६) आणि विनयचा मित्र धनुष (२४) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मृत तरुणाचं नाव मोहन कृष्णा असं असून तो पिग्मी कलेक्टर (रोज पैसे गोळा करणारा) आणि छोटा फायनान्सर होता.
मोहन कृष्णा आणि बिंदू तीन महिन्यांपूर्वीच या घरात राहायला आले होते. घरमालकाला त्यांनी आपण नवीन लग्न झालेलं जोडपं असल्याचं सांगितलं होतं.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, "बिंदू आणि कृष्णा दोघंही विवाहित होते, पण आपापल्या जोडीदारांपासून वेगळे राहत होते. जवळपास वर्षभरापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. बिंदूने काही कन्नड सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्याचा दावा केला आहे. तसंच, तिने टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शकांकडे असिस्टंट म्हणूनही काम केलं होतं."
कृष्णासोबत राहत असतानाच, बिंदूचं बागलगुंटेमध्ये राहणाऱ्या विनयसोबत प्रेमसंबंध जुळले. विनय हा अविवाहित असून ट्रक ड्रायव्हर आहे. या लव्ह ट्रँगलमुळे त्यांच्यात तणाव वाढला आणि भांडणं होऊ लागली.
पोलिसांनी पुढे सांगितलं, "बिंदूने कृष्णाला सांगितलं की तिला विनयसोबत लग्न करायचं आहे. पण कृष्णाचा याला तीव्र विरोध होता. यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचे. याच भांडणांमुळे त्यांचे घरमालक नटराज यांना कळालं की ते खरं तर नवरा-बायको नाहीत."
कृष्णाला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी बिंदू आणि विनयने मिळून एक कट रचला. त्यांनी या प्लॅनमध्ये धनुषलाही सामील करून घेतलं. धनुषला त्याच्या हॉटेलच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे कृष्णाच्या हत्येत मदत केल्यास त्याला पैसे देण्याचं आमिष विनयने दाखवलं.
एका अधिकाऱ्याने सांगितलं, "धनुषला व्यवसायात तोटा झाला होता. विनयने त्याला पैशांचं आमिष दाखवून कृष्णाला मारण्याच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं. ठरल्याप्रमाणे, त्यांनी कृष्णाला एका निर्जन ठिकाणी दारूच्या पार्टीसाठी बोलावलं. कृष्णाने थोडी दारू प्यायल्यानंतर, त्यांनी त्याचं तोंड दाबून त्यावर टेप लावली. त्यानंतर, त्यांनी कृष्णावर चाकूने वार केले आणि त्याचा मृत्यू झाल्यावर तिथून पळ काढला."