
गडचिरोली: गडचिरोलीच्या सीमेलगत असलेल्या अबुझमाड जंगलात बुधवारी सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं. देशातील ‘मोस्ट वाँटेड’ नक्षलवाद्यांपैकी एक आणि तब्बल कोट्यवधींच्या बक्षिसाचा धनी असलेला टॉप नक्षली अंबाला केशवराव उर्फ बसव राजू सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाला. याच चकमकीत एकूण २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेट गावचा रहिवासी असलेला बसव राजू, मूळात अभियांत्रिकी पदवीधर होता. वरंगलच्या राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक करताना तो विद्यार्थी नेता म्हणून पुढे आला आणि 1987 साली नक्षल चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन भूमिगत झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.
1992 मध्ये तो माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीवर पोहोचला, तर 2004 मध्ये त्याची निवड CPI (माओवादी) च्या लष्करी आयोग प्रमुख म्हणून झाली. त्याने संघटनेत मानधन प्रणाली सुरू करून जवळपास २०,००० युवकांना चळवळीत सहभागी करून घेतलं. मागील काही वर्षांत अनेक वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यामुळे बसव राजूवर पाच राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याची अनेक भुमिकांमध्ये ओळख होती. प्रकाश, विजय, कृष्णा, उमेश, कमलू ही त्याची टोपननावे.
बसव राजूवर महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये 200 हून अधिक नक्षलवादी हल्ल्यांचा आरोप होता. चकमक, आयईडी स्फोट, पोलीस आणि सीआरपीएफवरील घातपात, यामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता.
छत्तीसगड सरकारने त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं, तर इतर राज्यांनीही स्वतंत्र बक्षिसं ठेवल्याने त्याच्या एकूण इनामाची रक्कम कोट्यवधींवर पोहोचली होती. पण, सुरक्षा दलांनी अखेर अबुझमाड जंगलात मोठ्या ऑपरेशनमध्ये त्याचा शेवट केला. या कारवाईमुळे नक्षल चळवळीच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, “31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प सरकारने केला आहे.” बसव राजूच्या खात्म्याने त्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे.
हा केवळ एका नक्षलीचा अंत नव्हता, तर हिंसेच्या एका दीर्घकाळ चाललेल्या अध्यायाची पूर्णविराम होती. बसव राजूचा शेवट म्हणजे नक्षल चळवळीच्या हृदयावर झालेला जबरदस्त आघात.