Bangalore Doctor Murders Wife : बंगळूरमध्ये महिला डॉक्टर कृतिका रेड्डी यांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण सहा महिन्यांनंतर, फॉरेन्सिक रिपोर्टमधून गुंगीचं इंजेक्शन देऊन त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे.
बंगळूरमधील रहिवासी मुनिरेड्डी यांना निकिता आणि कृतिका रेड्डी (29) नावाच्या दोन मुली होत्या, दोघीही डॉक्टर होत्या. गेल्या वर्षी 6 मे रोजी कृतिका यांचे लग्न डॉ. महेंद्र रेड्डी यांच्याशी झाले. महेंद्र बंगळूरच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम करत होते.
25
बेशुद्ध पडून कृतिका रेड्डी यांचा मृत्यू
कृतिका रेड्डी त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. 23 एप्रिल रोजी त्या वडिलांच्या घरी असताना अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हॉस्पिटलने मारथहल्ली पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
35
कृतिका रेड्डी यांच्या बहिणीची तक्रार
कमी रक्तदाब आणि अपचनामुळे कृतिका यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली नाही. मात्र, पोलिसांच्या आग्रहावरून कृतिकाची बहीण निकिता हिने तक्रार दाखल केली.
यानंतर कृतिका रेड्डी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आता 6 महिन्यांनंतर त्यांचे पती डॉ. महेंद्र रेड्डी यांना अटक झाली आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेल्या नमुन्यांच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली. कृतिका यांचा मृत्यू आजारपणामुळे नाही, तर गुंगीचे इंजेक्शन दिल्यामुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
55
गुंगीचे इंजेक्शन देऊन हत्या
कृतिका यांना सतत उलट्या आणि चक्कर येत असल्याने, त्यांची हत्या करून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय महेंद्रने घेतला होता. त्यामुळे संशय येऊ नये म्हणून, वडिलांच्या घरी आलेल्या कृतिका यांना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.