
आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Aichi-Nagoya Asian Games 2026) मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावलं आहे. या सुवर्णपदक विजेत्या संघातील मिझोरामच्या लालरेमसियामी हमारजोते (Lalremsiami Hmarzote) आणि लालथांटलुआंगी (Lalthantluangi) या दोन खेळाडूंना मिझोराम सरकारने प्रत्येकी २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. भारताच्या सीनियर महिला हॉकी संघाकडून आपला २०० वा सामना खेळणाऱ्या लालरेमसियामीने चीनविरुद्ध एकमेव आणि निर्णायक गोल करत भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. तिच्या या गोलमुळेच भारताने तब्बल ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीत सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. याआधी १९८२ मध्ये भारताने हे पदक जिंकलं होतं. मिझोरामच्या या दोन खेळाडूंनी देशाच्या यशात मोलाचं योगदान दिल्यामुळे तिथे सध्या आनंदाचं वातावरण आहे.
मिझोरामचे मुख्यमंत्री लालडुहोमा (Mizoram Chief Minister Lalduhoma) यांनी लालरेमसियामी आणि लालथांटलुआंगी या दोघींचंही भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी संपूर्ण भारतीय संघाला या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. विशेषतः अर्जुन पुरस्कार विजेत्या लालरेमसियामीच्या उत्कृष्ट खेळाचं त्यांनी खास कौतुक केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारतीय संघाने थेट २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी (LA 2028 Olympics) पात्रता मिळवली आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात सध्या दुहेरी आनंद साजरा केला जात आहे. शुक्रवारी सुवर्णपदक निश्चित झाल्यानंतर, हॉकी इंडियानेही (Hockey India) महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ११ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला साडेपाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.