
हैदराबाद: AIMIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका करताना त्याला “मानवतेसाठी धोका” असे ठामपणे संबोधले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले की, “पाकिस्तान हा दहशतवादाचा पायाभूत पुरस्कर्ता आहे. त्याच्या कारवाया हे सिद्ध करतात की, तो देश केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी धोका बनला आहे.”
ओवेसी म्हणाले, "भारताने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली दहशतवादविरोधी भूमिका ठामपणे मांडली पाहिजे." त्यांनी यासंदर्भात अनेक गंभीर घटनांचा उल्लेख केला. झिया-उल-हक यांच्यापासून ते २६/११ मुंबई हल्ला, संसद हल्ला, उरी, पठाणकोट, कंधार विमान अपहरण आणि अलीकडील पहलगाम हल्ल्यापर्यंत आणि स्पष्ट केलं की "या सर्व घटनांत पाकिस्तानच्या भूमिकेबाबत काहीही दुमत राहिलेलं नाही."
ओवेसी पुढे म्हणाले, "१९४७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीपासून पाकिस्तानची मानसिकता कधीच बदललेली नाही. त्यांची गुप्तचर संस्था आणि ISIS सारख्या संघटनांच्या माध्यमातून भारतात अस्थिरता पसरवण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत." त्यांनी भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळातील सहभागाबद्दलही भाष्य केलं. "हे कोणत्याही पक्षाविषयी नसून, भारताच्या सुरक्षिततेविषयी आहे," असं सांगून त्यांनी स्पष्ट केलं की, "मी माझं प्रतिनिधित्व गांभीर्याने करेन आणि भारतासाठी योग्य तेच मांडेन."
ओवेसी यांनी पाकिस्तानच्या ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून केलेल्या दाव्यांवरही तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "भारतामध्ये २० कोटी मुस्लीम नागरिक शांततेने आणि अभिमानाने राहतात. त्यामुळे पाकिस्तानचा इस्लामचे एकमेव प्रतिनिधित्व करण्याचा दावा हास्यास्पद आणि निरर्थक आहे."
मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरही ओवेसी यांनी संताप व्यक्त केला. "कर्नल सोफिया या भारताच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहेत. त्यांच्या धर्माच्या आधारावर टिप्पणी करणं हे केवळ लज्जास्पद नाही, तर देशविघातक आहे," असे ओवेसी म्हणाले. त्यांनी भाजपकडे मागणी केली की, "अशा मंत्रीविरुद्ध कारवाई करून भारत जातीय द्वेष सहन करत नाही, हा स्पष्ट संदेश जगाला जावा."
असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानच्या दहशतवादप्रेमी भूमिकेवर रोखठोक हल्ला करत भारताला जागतिक व्यासपीठावर अधिक ठामपणे उभं राहण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या वक्तव्यातून भारताच्या सुरक्षा, एकात्मता आणि धर्मनिरपेक्षतेबद्दलचा कणखर संदेश स्पष्टपणे समोर येतो.