
दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीत ‘अपोलो अथेना’ या आशियातील पहिल्या महिलांसाठी विशेषतः समर्पित कर्करोग केंद्राचे उद्घाटन केले. हा आधुनिक कर्करोग उपचार केंद्र केवळ दिल्लीतीलच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि परदेशातील महिलांसाठीही लाभदायक ठरेल, असे त्या यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्री गुप्ता यांनी याला महिलांच्या आरोग्य सेवेत एक "महत्त्वाचा टप्पा" म्हटले आणि यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “सशक्त आणि सक्षम महिलांच्या देशाचे” स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लिमिटेड (AHEL) चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी, खासदार बंसुरी स्वराज, आमदार नीरज बसोया, AHEL चे कार्यकारी उपाध्यक्ष प्रीता रेड्डी, ग्रुप ऑन्कोलॉजी आणि इंटरनॅशनल विभागाचे संचालक हर्षद रेड्डी तसेच देश-विदेशातील नामांकित कर्करोग तज्ज्ञ या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार बंसुरी स्वराज म्हणाल्या, “कर्करोग प्रतिबंध आणि लवकर निदान याकडे भारत सरकार विशेष लक्ष देत आहे. ‘अपोलो अथेना’ महिला-केंद्रित कर्करोग उपचारात जागतिक दर्जा उभारेल आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनला बळकटी देईल.”
ग्लोबोकॅन 2022 च्या अहवालानुसार, भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या एकूण कर्करोग प्रकरणांपैकी सुमारे 54 टक्के प्रकरणे स्त्रियांशी संबंधित कर्करोग प्रकारांची आहेत. आयसीएमआरच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार, भारतात महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग सर्वाधिक प्रमाणात आढळतो.
अपोलो अथेना विषयी बोलताना डॉ. प्रताप रेड्डी म्हणाले, “हे केवळ रुग्णालय नाही, तर विज्ञान आणि सहवेदनेच्या संगमातून साकारलेले महिलांसाठीचे एक आरोग्य मंदिर आहे. आरोग्य ही भारताची ताकद आणि मानवतेची आशा आहे, हे या उपक्रमातून सिद्ध होते.”
'अपोलो अथेना' हे केंद्र महिलांसाठी सशक्त पाऊल उचलणारे महत्त्वाचे उदाहरण ठरणार असून, भारताच्या आरोग्यविषयक दूरदृष्टीचा अभिमानास्पद भाग ठरेल.