अन्वय द्रविडची शतकी खेळी

झारखंडविरुद्ध कर्नाटकने अवघ्या चार गडी गमावून ४४१ धावा केल्या.

बेंगळुरू: विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये राहुल द्रविड यांचे कनिष्ठ पुत्र अन्वय द्रविड यांनी कर्नाटकसाठी शतक झळकावले. झारखंडविरुद्धच्या सामन्यात विकेटकीपर असलेल्या अन्वयने १५३ चेंडूत १०० धावा केल्या. यात दोन षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. १६ वर्षांखालील मुलांसाठी विजय मर्चंट ट्रॉफी आयोजित केली जाते. विकेटकीपर अन्वय व्यतिरिक्त आर्य जे गौडा (१०४), कर्णधार ध्रुव कृष्णन (१२२) यांनीही शतके झळकावली. श्यामंतक अनिरुद्धने ७६ धावा केल्या.

या सर्वांच्या जोरावर झारखंडविरुद्ध कर्नाटकने अवघ्या चार गडी गमावून ४४१ धावा केल्या. झारखंडच्या पहिल्या डावातील ३८७ धावांच्या तुलनेत त्यांना आघाडी घेता आली. सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावातील आघाडीवर कर्नाटकला ३ महत्त्वाचे गुण मिळाले. विजय मर्चंट ट्रॉफीत अन्वयचे हे पहिलेच शतक आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या विजय मर्चंट ट्रॉफीतील अन्वयचा हा तिसरा डाव होता.

यापूर्वी दोन डावांमध्ये अन्वयने एक अर्धशतकसह ७५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षी १४ वर्षांखालील गटात अन्वयने कर्नाटकचे नेतृत्व केले होते. अन्वयचा मोठा भाऊ समित द्रविडही कर्नाटकसाठी खेळतो. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय १९ वर्षांखालील संघात समितची निवड झाली होती. मात्र, गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे समितला संपूर्ण मालिकेतून बाहेर बसावे लागले. त्यानंतर १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या संघातही समितला स्थान मिळाले नाही.

समित अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही, अशी बातमी आहे. समित हा अष्टपैलू खेळाडू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या विजेतेपदात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आठ सामन्यांत त्याने ३६२ धावा आणि १६ बळी घेतले. ऑगस्टमध्ये झालेल्या कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये समितने म्हैसूर वॉरियर्सकडूनही खेळला होता.

Share this article