Ansh Patidar : १९व्या वर्षी ९५ लाखांचं कर्ज फेडलं, अन् ५० कोटींची कंपनी उभी केली

Published : Jul 31, 2026, 07:21 PM IST
Success Story

सार

Ansh Patidar Success Story : मध्य प्रदेशच्या अंश पाटीदारची ही अविश्वसनीय कहाणी आहे. वयाच्या १७ व्या वर्षी ९५ लाखांच्या कर्जात बुडालेल्या या तरुणानं आज ५० कोटींची कंपनी उभी केली आहे. 'अरिवा ऑर्गेनिक्स'च्या माध्यमातून तो जैविक कीटकनाशकं आणि ड्रोन टेक्नॉलॉजी वापरून ५,००० हून अधिक शेतकऱ्यांचं आयुष्य बदलत आहे.

भोपाळ : ज्या वयात मुलं-मुली कॉलेज, अभ्यास आणि मित्रांसोबत मजा-मस्ती करण्यात दंग असतात, त्याच वयात मध्य प्रदेशमधला एक मुलगा स्वतःचं नशीब घडवत होता. ही कहाणी आहे अंश पाटीदारची, ज्याने फक्त १९व्या वर्षी ९५ लाख रुपयांचं कर्ज फेडलं आणि ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची कंपनी उभी केली.

शेतकरी कुटुंबात जन्म

अंश पाटीदार हा मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातल्या बोरला गावचा. तो एका शेतकरी कुटुंबात जन्माला आला. त्याचे वडील शेतात खूप मेहनत करायचे, पण वारंवार पिकाचं होणारं नुकसान आणि मालाला योग्य भाव न मिळाल्याने घरची परिस्थिती बेताचीच होती. आपल्या शिक्षणासाठी आईला तिचे दागिने विकावे लागू नयेत, असं अंशला वाटत होतं. त्यामुळे, त्याने कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

3,000 पासून केली सुरुवात

अंश वडिलांसोबत शेतीच्या कामात मदत करायचा. यावेळी त्याने शेतकऱ्यांच्या समस्या अगदी जवळून पाहिल्या. त्याच्या लक्षात आलं की, शेतकरी एकाच केमिकल कंपोझिशनच्या कीटकनाशकांसाठी जास्त पैसे मोजत आहेत. बस, इथूनच त्याला त्याच्या पहिल्या व्यवसायाची कल्पना सुचली. त्याने फक्त 3,000 च्या गुंतवणुकीतून गुजरातच्या उत्पादकांकडून थेट शेतीची उत्पादनं विकत घेतली आणि स्थानिक शेतकऱ्यांना कमी किमतीत विकायला सुरुवात केली. कमी दरात चांगल्या दर्जाची उत्पादनं मिळाल्याने शेतकऱ्यांचा अंशवर विश्वास वाढला आणि हळूहळू त्याचं काम आसपासच्या गावांमध्येही पसरलं.

१५ व्या वर्षी बनला व्यावसायिक

रिपोर्ट्सनुसार, वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी GST रजिस्ट्रेशन मिळवणाऱ्या काही सर्वात तरुण भारतीय व्यावसायिकांपैकी तो एक बनला. एकीकडे शाळेचा अभ्यास आणि दुसरीकडे व्यवसाय, दोन्ही गोष्टी सांभाळणं सोपं नव्हतं. अंश दिवसा शाळेत जायचा, संध्याकाळी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना भेटायचा आणि रात्री घरी परतल्यावर अभ्यास करायचा. त्याच्या मेहनतीला लवकरच फळ मिळालं. असं म्हटलं जातं की, फक्त १८ महिन्यांत त्याच्या व्यवसायाची उलाढाल सुमारे 40 लाखांपर्यंत पोहोचली होती.

१७ व्या वर्षी ९५ लाखांचं कर्ज

आपला व्यवसाय आणखी मोठा करण्यासाठी अंशने एक ॲग्री-टेक प्लॅटफॉर्म सुरू केला. पण त्याची ही कल्पना यशस्वी झाली नाही. याचा परिणाम असा झाला की, वयाच्या १७व्या वर्षी अंशवर तब्बल ९५ लाख रुपयांचं प्रचंड कर्ज झालं. एवढं मोठं कर्ज पाहून कुणीही खचून गेलं असतं, पण अंशने हार मानली नाही. त्याने शेतकऱ्यांसोबत काम करून पुन्हा त्यांचा विश्वास जिंकला आणि हळूहळू आपलं सर्व कर्ज फेडलं.

२०२२ मध्ये नवी सुरुवात

२०२२ मध्ये अंश पाटीदारने 'अरिवा ऑर्गेनिक्स' (Ariva Organics) नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी जैविक कीटकनाशकं आणि ड्रोनवर आधारित शेतीच्या सोल्यूशन्सवर काम करते. कंपनीने असं तंत्रज्ञान आणलं, ज्यामुळे शेतकऱ्यांचा पाणी, खतं आणि मजुरीवरचा खर्च कमी झाला. शेतीत तंत्रज्ञान आणि नवनवीन कल्पनांचा वापर केल्याने त्याचा व्यवसाय वेगाने वाढू लागला. रिपोर्ट्सनुसार, फक्त एका वर्षाच्या आत कंपनीचं व्हॅल्युएशन 50 कोटींपेक्षा जास्त झालं. कंपनीने १५,००० एकरपेक्षा जास्त शेतजमिनीवर ५,००० हून अधिक शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगितलं जातं.

९५ लाखांच्या कर्जापासून ते ५० कोटींच्या साम्राज्यापर्यंत

वयाच्या १७व्या वर्षी ९५ लाखांच्या कर्जात बुडालेला एक मुलगा, काही वर्षांतच ते आव्हान पार करून ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची कंपनी उभी करतो, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. अंश पाटीदारची गोष्ट फक्त एका तरुण व्यावसायिकाच्या यशाची कहाणी नाही, तर ती हे दाखवते की जर समस्यांना संधीत बदलण्याची जिद्द, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची वृत्ती आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचं धाडस असेल, तर कोणतीही कठीण परिस्थिती बदलता येते.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Berlin Marathon: बर्लिन मॅरेथॉनमध्ये चिनी इन्फ्लुएन्सरची चोरी पकडली, सायकलवरून मारली शॉर्टकट!
Morgan Stanley: मॉर्गन स्टॅनलीने MARA, RIOT, GLXY चे टार्गेट घटवले, तरीही १००% पेक्षा जास्त फायद्याची शक्यता