Andhra Pradesh Viral Video : ना रस्ता ना रुग्णवाहिका! आजारी लेकीला खांद्यावर घेऊन आईची ७ किमी पायपीट

Published : Nov 03, 2026, 01:43 PM IST
Andhra Pradesh Viral Video : ना रस्ता ना रुग्णवाहिका! आजारी लेकीला खांद्यावर घेऊन आईची ७ किमी पायपीट

सार

'अर्णब' चक्रीवादळामुळे रस्ते वाहून गेल्याने विजयनगरम जिल्ह्यातील एका आदिवासी आईवर मोठी वेळ आली. तिने आपल्या १२ वर्षांच्या आजारी मुलीला उपचारासाठी चक्क ७ किलोमीटर खांद्यावरून नेलं. या घटनेनंतर खासदार विजय चिंताकायला यांनी गावाला तातडीने रुग्णवाहिका दिली आहे.

मुंबई : विजयनगरम जिल्ह्यातील पलुपू डुंगडा या आदिवासी गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे गावाचा रस्ता तुटला. त्यामुळे जन्नी सुकरम्मा या आईने आपली १२ वर्षांची आजारी मुलगी संपूर्णाला चक्क ७ किलोमीटर खांद्यावरून रुग्णालयात नेलं. या घटनेची आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

मंत्री नारा लोकेश यांनी यावर तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानंतर राज्यसभा खासदार विजय चिंताकायला यांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या खासदार निधीतून (MPLADS) या गावाला एक रुग्णवाहिका दिली आहे. "ही माझी छोटीशी मदत आहे. कोणत्याही आईवर आपल्या मुलासाठी रुग्णवाहिका बनण्याची वेळ येऊ नये," अशी भावना विजय चिंताकायला यांनी व्यक्त केली.

रविवारी विजयनगरम जिल्ह्यात ही घटना घडली. शृंगवरपुकोटा मंडळातील पल्लापू डुंगडा गावात पक्के रस्तेच नाहीत. त्यातच वादळामुळे रस्ते आणखी खराब झाले. अशातच एका आदिवासी महिलेने आपल्या आजारी मुलीला उपचारासाठी खांद्यावर घेऊन डोंगरदऱ्यांतून सात किलोमीटरची पायपीट केली.

जन्नी संपूर्णा खूप आजारी होती आणि तिला चालताही येत नव्हतं. गावात वाहने येण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे तिची आई सुकरम्मा हिने तिला खांद्यावर घेतलं आणि डब्बागुंटा जवळच्या पायथ्यापर्यंत सुमारे सात किलोमीटरचा खडबडीत रस्ता पार केला. खाचखळगे आणि ओढे पार करत ती कशीबशी मुख्य रस्त्यावर पोहोचली. तिथून तिने एका रिक्षाने मुलीला खाजगी रुग्णालयात नेलं. मुलीवर उपचार झाल्यानंतर सुकरम्माने पुन्हा तिला खांद्यावर घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला.

हा मन हेलावणारा व्हायरल व्हिडीओ पाहा

'अर्णब' चक्रीवादळामुळे इथले रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता इतका खराब झालाय की तिथून चालणंही कठीण आहे. पण सुकरम्माने एका हातात पाण्याची बाटली आणि पिशवी पकडली, तर दुसऱ्या बाजूला मुलीला खांद्यावर सावरलं. मुलीला वेळेवर उपचार मिळावेत म्हणून या माऊलीने हा सगळा संघर्ष केला.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Road Markings : रस्त्यावरील पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ माहितीये का?
Raj Thackeray l राज ठाकरे यांच्या नातीचं नाव काय ठेवलं? नावाला 301 वर्षांचा इतिहास