
नवी दिल्ली: दिल्लीत आंदोलने आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा केली. अमित शाह यांनी थेट दिल्ली पोलीस मुख्यालयात जाऊन ही बैठक घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमधील आतापर्यंत नोंदवलेले ५७ गुन्हे क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आले आहेत. दुसरीकडे, येत्या ३० तारखेला विरोधक ज्ञानेश कुमार यांच्यावर प्रतिकात्मक महाभियोग चालवणार आहेत. दरम्यान, नेहा बोरा आज स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटसमोर हजर झाल्या. आपण पीस बाँडवर सही करणार नाही, या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या.
काँग्रेसने १ नोव्हेंबरला महारॅलीची घोषणा केली आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर शीख समुदायाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. १ नोव्हेंबर हा शीख बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. याच दिवशी आंदोलन पुकारणे, ही काँग्रेसची शीखविरोधी मानसिकता दर्शवते, असा घणाघात भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला. या आंदोलनावरून 'इंडिया' आघाडीतही राहुल गांधी यांच्याशी मतभेद आहेत. काँग्रेसने शीख भावनांची खिल्ली उडवली असून, शिखांबद्दलची त्यांची भूमिका यापूर्वीही स्पष्ट झाली आहे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.