
नवी दिल्ली : एअर इंडियाने स्वतःचे फ्लाइंग स्कूल स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीचा उद्देश एअरलाइन म्हणजेच विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी देण्याचा आहे. फ्लाइंग स्कूल उपक्रम हा एअर इंडियाच्या देशांतर्गत प्रशिक्षण सुविधा वाढविण्याच्या आणि कुशल वैमानिकांच्या विकासासाठी योगदान देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे.
जागतिक स्तरावर प्रशिक्षित वैमानिकांची वाढती मागणी आणि भारतातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. फ्लाइंग स्कूलमध्ये विविध वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रारंभिक, उच्च आणि व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण प्रोग्रामचा समावेश असणार आहे. तसेच एअर इंडियाच्या फ्लाइंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक आणि प्रगत विमान वाहतूक उपकरणे वापरली जाणार आहेत. यामध्ये उच्च दर्जाचे फ्लाइंग सिम्युलेटर आणि इतर विमानसेवेशी संबंधित उपकरणांचा समावेश असणार आहे.
दरवर्षी १८० वैमानिकांना प्रशिक्षण
वैमानिकांच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी एअर इंडियाने महाराष्ट्रातील अमरावती येथे एक स्कूल उघडण्याची योजना आखली आहे. या स्कूलचे उद्दिष्ट दरवर्षी १८० वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे आहे. कोणतेही पूर्व उड्डाण अनुभव नसलेले संभाव्य वैमानिक पूर्णवेळ अकादमीमध्ये प्रवेश घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना प्रशिक्षणाचे पुढील टप्पे पूर्ण केल्यानंतर एअर इंडियाच्या कॉकपिटमध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा असेल.
अनुभवी वैमानिकांद्वारे प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी एअर इंडिया अनुभवी आणि प्रमाणित वैमानिकांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची योजना आखत आहे. फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेशासाठी निवड प्रक्रिया कठोर असणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, शारीरिक तंदुरुस्ती आणि वैयक्तिक मुलाखत यांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
जागतिक स्तरावरील विमान कंपन्यांमध्येही करिअर
एअर इंडिया फ्लाइंग स्कूलमधील यशस्वी उमेदवार केवळ एअर इंडियामध्येच नव्हे तर जागतिक स्तरावरील इतर विमान कंपन्यांमध्येही करिअर करण्यासाठी तयार असतील. विमान वाहतूक उद्योगातील कुशल वैमानिकांची वाढती मागणी पूर्ण करणे आणि भारतातील या क्षेत्राच्या एकूण वाढीस हातभार लावणे हा कंपनीच्या या उपक्रमाचा उद्देश आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे विमान वाहतूक क्षेत्रात नव्या अपेक्षा तर वाढतीलच, शिवाय तरुणांना विमान वाहतूक क्षेत्रातील त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणखी एक माध्यम मिळेल. नजीकच्या काळात फ्लाइंग स्कूलचे कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आणखी वाचा :
अमरनाथ यात्रा ऑनलाइन हेलिकॉप्टर बुकिंग सुरू, तिकिटाची किंमत, मार्ग आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घ्या