
अहमदाबाद: अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळलेलं एअर इंडियाचं AI-171 हे विमान, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्ससह जळून खाक झालं. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने अहमदाबादला पोहोचले. त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि अपघातात एकमेव वाचलेल्या प्रवाशाची प्रत्यक्ष भेट घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी उघड केल्या.
अमित शाह म्हणाले, "विमानात सव्वा लाख लीटर इंधन होतं. अपघातानंतर इतकं तापमान वाढलं की वाचण्याची कोणालाही संधी मिळाली नाही. जळालेलं हे दृश्य अतिशय हृदयद्रावक होतं. अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीनं मोर्चा सांभाळला, पण परिस्थिती अत्यंत कठीण होती."
"अपघाताची माहिती मिळताच केवळ 10 मिनिटांत केंद्र सरकारला याची कल्पना देण्यात आली. मी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृह मंत्रालयाच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तत्काळ फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे बचावकार्य हाती घेतलं," अशी माहिती शाह यांनी दिली.
"या विमानात देश-विदेशातील एकूण 242 प्रवासी होते. सध्या एकमेव प्रवासी वाचला आहे. मी त्याची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही मृतदेह पूर्णपणे ओळखू न येण्यासारखे अवस्थेत असल्याने नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत," असं शाह यांनी सांगितलं.
"ही दुर्घटना संपूर्ण देशासाठी वेदनादायक आहे. मृतांचे कुटुंबीय एकटे नाहीत, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. केंद्र सरकार आणि गुजरात सरकार दोघंही प्रत्येक पातळीवर मदत करत आहेत," अशा शब्दांत अमित शाह यांनी आपली सहवेदना व्यक्त केली.