
नवी दिल्ली : भारताने २०३० च्या राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदासाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी अहमदाबादची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयाने शहरात जागतिक दर्जाची क्रीडा सुविधा, आधुनिक प्रशिक्षण केंद्र आणि एक मजबूत क्रीडा संस्कृती असल्याचे कारण दिले आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (IOA) मार्चमध्येच यजमानपदासाठी भारताची तयारी जाहीर केली होती, आणि आता केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केला आहे. या स्पर्धेची बोली सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट असल्याने, आता IOA पुढील दोन दिवसांत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करेल. भारताने यापूर्वी २०१० मध्ये राष्ट्रकुल खेळांचे यशस्वी आयोजन केले आहे.
अहमदाबादची यजमान शहर म्हणून निवड झाल्यामुळे काही राजकीय वाद निर्माण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वी, २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईऐवजी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला होता, तेव्हाही असाच वाद झाला होता. विशेष म्हणजे, त्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
२०३६ च्या ऑलिंपिकसाठी देखील अहमदाबादला लक्ष्य केले जात आहे. यासाठी शहरात सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. यात क्रिकेट स्टेडियमसह दोन मोठी फुटबॉल मैदाने आणि जलतरण तलावासारख्या इतर सुविधांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय खेळांचे यशस्वी आयोजन गुजरातमध्ये झाले होते. राष्ट्रकुल खेळांमध्ये ७२ देशांचे खेळाडू सहभागी होतात. त्यामुळे काही खेळ दुसऱ्या शहरांमध्येही आयोजित केले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे, ज्यात गुवाहाटी किंवा उत्तर प्रदेशसारख्या शहरांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा सुरू झालेली नाही.