
अहमदाबाद - अदानी डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) ने भारतीय विमानन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. होरायझन एरो सोल्युशन्स लिमिटेडच्या माध्यमातून, प्राइम एरो सर्व्हिसेस LLP सोबत भागीदारीत, देशातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य MRO (मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल) प्रदाता इंडामर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड (ITPL) मधील १०० टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा करार कंपनीने केला आहे. सोमवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.
होरायझन एरो सोल्युशन्स ही ADSTL आणि प्राइम एरो यांच्यातील समान (५०-५०) भागीदारी आहे. प्राइम एरोचे नेतृत्व इंडामर टेक्निक्सचे संचालक प्रजाय पटेल करत आहेत. नागपूर येथील MIHAN विशेष आर्थिक क्षेत्रात (SEZ) ३० एकर जागेवर ITPL ची अत्याधुनिक ग्रीनफील्ड सुविधा उभारण्यात आली आहे. या सुविधेत १० हँगर असून त्यामध्ये १५ विमान बे एकावेळी सामावू शकतात. ITPL ला DGCA, अमेरिकेची FAA तसेच इतर जागतिक नागरी विमानन नियामक संस्थांकडून मान्यता मिळालेली आहे.
ITPL विविध प्रकारच्या विमान सेवांचा संपूर्ण संच पुरवते. यात लीज रिटर्न चेक्स, हेवी सी-चेक्स, स्ट्रक्चरल दुरुस्ती आणि विमान पेंटिंगसारख्या महत्त्वाच्या MRO सेवांचा समावेश आहे. हे कामकाज कंपनी देशातील तसेच परदेशातील प्रमुख ग्राहकांसाठी करते.
अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले, “भारतीय विमान वाहतूक क्षेत्राने अभूतपूर्व वाढ अनुभवली असून, प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत भारत आज जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही वर्षांत भारतीय विमान कंपन्या १५०० हून अधिक नवीन विमाने ताफ्यात सामील करण्याच्या तयारीत आहेत. हे अधिग्रहण भारताला जागतिक स्तरावरील MRO केंद्र बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टातील पुढील महत्त्वाचे पाऊल आहे. आमचे ध्येय म्हणजे जागतिक दर्जाच्या गुणवत्ता मानकांसह आणि ग्राहक समाधानावर आधारित एकसंध विमान सेवा प्लॅटफॉर्म उभारणे.”
अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी यांनी अधोरेखित केले की, “व्यावसायिक तसेच संरक्षण विमान वाहतूक क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण MRO सेवा पुरविण्याच्या दृष्टीने हा टप्पा निर्णायक आहे. एअर वर्क्सच्या अधिग्रहणानंतर आता ITPL चा समावेश झाल्यामुळे MRO क्षेत्रातील आमची ताकद आणि क्षमता अधिक दृढ झाली आहे. नागपूरचे मध्यवर्ती भौगोलिक स्थान आमच्या सर्व भारतातील उपस्थितीला बळकटी देते आणि व्यवसाय विस्तारासाठी मोठी संधी उपलब्ध करून देते.”
इंडामर टेक्निक्स आणि प्राइम एरोचे संचालक प्रजाय पटेल यांनी या भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला. “अदानी डिफेन्स अँड एरोस्पेससोबत हातमिळवणी करून इंडामर टेक्निक्सला नव्या उंचीवर नेण्याचा आम्हाला विश्वास आहे. सखोल अभियांत्रिकी कौशल्य, सक्षम पायाभूत सुविधा आणि पुरेशा विकास भांडवलाच्या आधारे आम्ही जागतिक दर्जाचे MRO परिसंस्था भारतातून निर्माण करू,” असे त्यांनी नमूद केले.
अदानी समूहाचा एक भाग असलेला अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस हा अत्याधुनिक संरक्षण उत्पादने डिझाइन, विकसित आणि निर्मिती करणारा देशातील अग्रगण्य उद्योग आहे. या अधिग्रहणामुळे भारतातील MRO सेवा क्षमतांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची ताकद मिळणार आहे, तसेच नागपूर हे एक महत्त्वाचे विमान सेवा केंद्र म्हणून नवे ओळख निर्माण करेल.