
'KGF: चॅप्टर 2' च्या तुफान यशानंतर, सुपरस्टार यशचा नवा पॅन-इंडिया सिनेमा 'टॉक्सिक: ए फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पॅनोरमा स्टुडिओजने हा सिनेमा केरळमध्ये प्रदर्शित करण्याचे हक्क मिळवले आहेत. यासाठी त्यांनी तिथली मोठी निर्मिती संस्था असलेल्या सेंच्युरी फिल्म्ससोबत भागीदारी केली आहे. यशची निर्मिती संस्था मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स आणि केव्हीएन प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने ही डील झाली आहे. गीतू मोहनदास या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होईल.
'टॉक्सिक' हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या वर्षातील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक मानला जातोय. सिनेमाची स्टारकास्टही तगडी आहे. यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांसारखे मोठे चेहरे दिसणार आहेत. जुन्या गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या सिनेमाची कथा गुन्हेगारी, सत्ता, वासना आणि विश्वासघात याभोवती फिरते. यात यश 'राया' नावाचं पात्र साकारणार आहे.
या डीलमुळे पॅनोरमा स्टुडिओज दक्षिण भारतात आपलं स्थान आणखी मजबूत करत आहे. याआधी पॅनोरमाचे मल्याळम चित्रपट 'अनोमी' आणि 'उन्मादम' यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या 'टिकी टाका', टोविनो थॉमसचा 'प्रॉडक्शन नंबर ४' आणि 'मुनपे' हे सिनेमेही पॅनोरमाच्या निर्मितीखाली तयार होत आहेत. इतकंच नाही, तर निविन पॉली आणि फहाद फासिल यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबतही पॅनोरमा स्टुडिओज काम करत आहे. केरळमध्ये यशची प्रचंड फॅन फॉलोइंग आणि गीतू मोहनदास यांची वेगळी दिग्दर्शन शैली पाहता, 'टॉक्सिक' तिथे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच सेंच्युरी फिल्म्ससोबत मिळून हा सिनेमा भव्य पद्धतीने प्रदर्शित करण्याची तयारी पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.