
भारतीय सिनेप्रेमी ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या 'रामायण' चित्रपटाचा नवा कॅरेक्टर पोस्टर नुकताच समोर आला आहे. हा पोस्टर यशचा असून तो यात रावणाची भूमिका साकारत आहे. 'स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकांचा स्वामी रावण', अशा कॅप्शनसह हा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यशच्या करिअरमधील हा सर्वात दमदार परफॉर्मन्स असेल, याची खात्री आधी आलेल्या ट्रेलरने दिली होती. रणबीर कपूर आणि सई पल्लवी मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये धडकणार आहे.
नितेश तिवारी यांनी या भव्य 'रामायण' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात रणबीर कपूर प्रभू श्रीराम आणि सई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साऊथचा सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत धुमाकूळ घालणार आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर मल्याळमची लोकप्रिय अभिनेत्री शोभना कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, दूरदर्शनवरील 'रामायण' मालिकेत रामाची भूमिका गाजवणारे अरुण गोविल यात राजा दशरथाच्या भूमिकेत पुनरागमन करत आहेत. याशिवाय रवी दुबे लक्ष्मण, रकुल प्रीत सिंग शूर्पणखा, अजिंक्य देव महर्षी विश्वामित्र आणि कुणाल कपूर इंद्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे.
ऑस्कर विजेते संगीतकार हान्स झिमर आणि ए. आर. रहमान या चित्रपटाला संगीत देणार आहेत, हे या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण आहे. दरम्यान, 'रामायण'चे म्युझिक राईट्स विक्रमी किमतीत विकले गेले आहेत. टी-सीरीजने हे हक्क विकत घेतले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स करार झाला असून, हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या म्युझिक राईट्सच्या व्यवहारांपैकी एक मानला जात आहे.