
अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि नव्या आयफोनच्या लाँचची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, पण एका वेगळ्याच कारणामुळे. एका इंस्टाग्राम पेजने तर कल्पनेचे इमले रचत धुमाकूळ घातला आहे. 'satirelogy' नावाच्या या पेजने एक दावा केला की, ॲपलच्या नवीन आयफोन 18 प्रोचा 'बरगंडी' रंग चक्क अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या 'ॲनिमल' सिनेमातील प्रसिद्ध लव्ह मार्कवरून घेतला आहे. ही एक व्यंगात्मक (satirical) पोस्ट होती, पण ती इतकी भन्नाट होती की वाऱ्यासारखी पसरली. या पोस्टमध्ये ॲपलचे सीईओ जॉन टर्नस आणि तृप्ती यांच्यात काल्पनिक संवाद झाल्याचंही दाखवण्यात आलं होतं. पाहता पाहता ही पोस्ट सोशल मीडियावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली.
ही गंमत सुरू झाली 9 सप्टेंबर 2026 रोजीच्या एका बातमीवरून. या दिवशी ॲपलने आपले लेटेस्ट आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल लाँच केले. यात एका नव्या 'बरगंडी' रंगाचा समावेश होता. विशेष म्हणजे, 1 सप्टेंबर 2026 रोजीच टिम कुक यांच्यानंतर जॉन टर्नस यांनी ॲपलच्या सीईओ पदाची सूत्रं हाती घेतली होती. याच नव्या नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर हा व्हायरल विनोद तयार झाला.
सूर्यभान कुमारच्या 'Satirelogy' या इंस्टाग्राम पेजवरील पोस्टमध्ये गंमतीने म्हटलं होतं की, "आयफोन 18 च्या लाँचवेळी सीईओ जॉन टर्नस यांनी स्वतः सांगितलं की, नव्या बरगंडी रंगाची प्रेरणा 'ॲनिमल'मधील तृप्ती डिमरीच्या लव्ह मार्कवरून घेतली आहे." इतकंच नाही, तर या पोस्टमध्ये असंही म्हटलं की, तृप्ती फक्त ॲपल पार्कमध्ये हजर नव्हती, तर सीईओ टर्नस यांनी स्वतः तिला नवीन डिव्हाइस दाखवले. या तपशिलामुळे हा विनोद अधिकच रंजक बनला. या पोस्टला 3,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आणि लोकांनी त्यावर भरपूर कमेंट्स आणि शेअर्स केले. विशेष म्हणजे, पोस्टच्या खाली स्पष्टपणे लिहिले होते की, "ही खरी बातमी नाही. ही पोस्ट आणि पेज पूर्णपणे व्यंग्यात्मक आहे. ही पोस्ट फक्त मनोरंजनासाठी आहे." तरीही ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली.
आता यातील खरी गोष्ट अशी की, तृप्ती डिमरी खरोखरच ॲपलच्या मोठ्या लाँच इव्हेंटसाठी कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो शहरात गेली होती. ॲपल पार्कमध्ये गायक एपी ढिल्लनसोबत तिची उपस्थिती अनेकांनी नोटीस केली. रिपोर्ट्सनुसार, तिने कार्यक्रमादरम्यान जॉन टर्नस यांच्याशी संवादही साधला. तृप्तीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या भेटीचे फोटो पोस्ट केले होते. याच खऱ्या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि 'Satirelogy' ने या संधीचं सोनं करत ही भन्नाट पोस्ट तयार केली.
एका युझरने लिहिले, "चांगली निवड आहे." दुसऱ्याने लिहिले, "म्हणायचं काय आहे तुम्हाला?" तर आणखी एका युझरने कमेंट केली, "हे तर तृप्ती डिमरीचं PR काम दिसतंय." तर दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटलं होतं, "आपले भारतीय काहीही करू शकतात."