
सूर्याची मुख्य भूमिका असलेला आणि जितू माधवनने दिग्दर्शित केलेला 'सीन' हा तमिळ चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. सूर्या, नझरिया आणि नसलान यांचा अभिनय हाच या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट असल्याचं प्रेक्षक सांगत आहेत. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने कमाल केली आहे. रिलीजच्या अवघ्या नऊ दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल २४३ कोटींची कमाई केली आहे.
मास ॲक्शन, कॉमेडी आणि थ्रिलर अशा सगळ्याचा भन्नाट मेळ या चित्रपटात आहे. थोडक्यात सांगायचं तर हा एक कम्प्लीट एंटरटेनर सिनेमा आहे. श्री गोकुळम गोपालन यांच्या श्री गोकुळम मूव्हीजने हा चित्रपट केरळमध्ये प्रदर्शित केलाय. झगरम स्टुडिओज आणि 2D एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली ज्योतिका आणि सूर्याने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर जयश्री दामोदरन या सहनिर्मात्या आहेत.
या चित्रपटात सूर्या डीएसपी इंबराज या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचा स्टायलिश आणि डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावतोय. चित्रपटाची व्हिज्युअल ट्रीट आणि सुशिन श्यामच्या बॅकग्राउंड म्युझिकचंही खूप कौतुक होत आहे. सूर्या, नसलान आणि नझरिया नाझीमसोबतच आनंद राज, लाल आणि राज प्रियन यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'रोमांचम' आणि 'आवेशम' या दोन सुपरहिट मल्याळम सिनेमांनंतर जितू माधवनने 'सीन'च्या माध्यमातून तमिळ सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. मल्याळममध्ये हिट ठरलेली जितू माधवन आणि सुशिन श्याम ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलीय, हे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य.