श्रीदेवींची 'तिसरी मुलगी' पाकिस्तानातली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री!

हे शीर्षक वाचून तुम्हाला गोंधळ उडाला असेल. श्रीदेवींना दोनच मुली होत्या ना? एक जान्हवी कपूर आणि दुसरी खुशी कपूर. मग तिसरी कुठून आली? तिचीच गोष्ट सांगतो ऐका.

पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि उत्तम कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्यांच्या प्रतिभेची प्रशंसा मिळवली आहे. त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकजण मंत्रमुग्ध होतात. अशाच एक सेलिब्रिटी म्हणजे सजल अली. ३० वर्षीय ही अभिनेत्री पाकिस्तानात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिने 'नादनियां' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'सिंफ-ए-आहान', 'इश्क-ए-ला', 'ये दिल मेरा', 'यकीन का सफर' आणि 'कुछ अनकही' यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये तिने उत्तम भूमिका केल्या आहेत.

हे बरोबर आहे, पण या अभिनेत्रीचा श्रीदेवींशी काय संबंध? तो आहे. २०१७ मध्ये बॉलिवूडमध्ये 'मॉम' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात श्रीदेवी आणि अदनान सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातून सजल अलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात ती श्रीदेवींच्या मुलीच्या भूमिकेत होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सजल अली आणि श्रीदेवी यांच्यातील नाते घट्ट झाले. त्या सेटवर खूप जवळच्या झाल्या. श्रीदेवींच्या दोन मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर आपल्या सर्वांना माहिती आहेत. एका मीडिया कार्यक्रमात श्रीदेवींनी सजल अलीला "माझी तिसरी मुलगी" असे म्हटले होते. सजलने 'मॉम' चित्रपटात केवळ श्रीदेवींच्या पडद्यावरील मुलीची भूमिकाच केली नाही तर त्यांच्या खऱ्या मुलीसारखीच वागली. त्यावेळी ५३ वर्षीय श्रीदेवींना २३ वर्षीय सजल खूप आवडत असे. 'मॉम' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रीदेवींनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “सजल माझ्या तिसऱ्या मुलीसारखी आहे. आता मला असे वाटते की माझी आणखी एक मुलगी आहे".

१९९४ मध्ये लाहोरमध्ये जन्मलेल्या सजलने एका मुलाखतीत सांगितले होते की, “ज्या दिवशी माझ्या आईचे निधन झाले, त्या दिवशी ही खोली लोकांनी भरलेली होती. हे सर्व कसे सहन करायचे याची मला कल्पना नव्हती. पण मी ते सहन केले". सजल अलीच्या खऱ्या आईचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यावेळी सजलचे श्रीदेवींशी खूप चांगले संबंध होते.

'मॉम' हा सजलचा एकमेव हिंदी चित्रपट होता. पण हनु राघवपुडी दिग्दर्शित आगामी 'फौजी' चित्रपटात पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभाससोबत अली लवकरच दिसणार असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील एका प्रमुख नियतकालिकाने ही बातमी दिली आहे. 'फौजी' हा एक ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित आहे.

सजल अली ही पाकिस्तानात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. जुलै २०२४ च्या अहवालानुसार, ती पाकिस्तानी मनोरंजन उद्योगात (लॉलीवूड) सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या मालिकांमधील भूमिकांसाठी प्रत्येक भागासाठी लाखो रुपये कमावते. तिची एकूण संपत्ती ८० लाख डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.

Share this article