
Rahul Deshpande divorce with Neha Deshpande : प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा आणि भावनिक निर्णय चाहत्यांसमोर उघड केला आहे. लग्नाच्या 17 वर्षांच्या सहजीवनानंतर, राहुल आणि नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली. सप्टेंबर 2024 मध्ये दोघांचा कायदेशीर घटस्फोट शांततेत पार पडला असून, हे नातं संपलं असलं तरी परस्पर सन्मान आणि मुलीच्या जबाबदारीत दोघेही एकत्र आहेत, असं राहुल यांनी स्पष्ट केलं आहे.
राहुल देशपांडे यांच्या शब्दांत, "माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. त्यामुळे ही वैयक्तिक पण महत्त्वाची गोष्ट शेअर करणं मला आवश्यक वाटलं. नेहा आणि मी 17 वर्षे अनेक सुंदर आठवणींसह एकत्र होतो. आता आम्ही दोघेही एकमेकांच्या निर्णयाचा सन्मान करत स्वतंत्र आयुष्य जगत आहोत." राहुल यांनी असंही सांगितलं की, हा निर्णय जाहीर करण्याआधी त्यांनी स्वतःला आणि कुटुंबाला वेळ दिला, विशेषतः त्यांच्या मुलीच्या दृष्टीने हे काळजीपूर्वक पाऊल उचललं.
राहुल यांनी त्यांच्या मुलीबाबतही एक भावनिक विधान केलं आहे. "रेनुका ही आमच्या दोघांची जबाबदारी आहे. तिच्या भविष्याच्या दृष्टीने आम्ही नेहमीच सहकार्य करू. आमचं पालकत्त्व, प्रेम आणि स्थैर्य कायम राहील, जरी आम्ही आता वेगळ्या वाटेवर असलो तरी." या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या असून, राहुल आणि नेहा यांच्या निर्णयाचा आदर करत त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हा निर्णय केवळ एका नात्याचा शेवट नाही, तर स्वतंत्र जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे दोघांनीही परिपक्वतेने आणि शांततेने घेतलेला हा निर्णय, अनेकांसाठी एक समंजस उदाहरण ठरतो.