
आज तमिळ सिनेसृष्टीतले आघाडीचे अभिनेते १०० कोटींहून अधिक मानधन घेतात. रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार आणि धनुष हे स्टार्स एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये आकारतात. राजकारणात जाण्यापूर्वी विजय २०० कोटींहून अधिक मानधन घेत होता. आता त्याने राजकारणात प्रवेश केल्यामुळे रजनीकांत मानधनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. पण आज कोट्यवधी रुपये कमावणारे हे स्टार्स त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी किती रुपये घ्यायचे माहितीये? यापैकी काहींनी अगदी काहीशे रुपयांपासून करिअरची सुरुवात केली होती.
तमिळ सिनेमाचे 'सुपरस्टार' रजनीकांत यांनी आपल्या अनोख्या स्टाईल आणि अभिनयाने जगभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणाऱ्या रजनीकांत यांनी करिअरच्या सुरुवातीला फक्त २५० रुपये मानधन घेतलं होतं. के. बालचंदर दिग्दर्शित 'अपूर्वा रागंगल' या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर सुरुवातीच्या काळात मुख्य अभिनेता म्हणून काम करताना त्यांनी ५,००० रुपयांपर्यंत मानधन घेतल्याचं सांगितलं जातं.
'उलगनायगन' कमल हासन यांनी बालकलाकार म्हणूनच सिनेसृष्टीत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. लहान वयातच त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यानंतर अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. आज १०० कोटींहून अधिक मानधन घेणाऱ्या कमल हासन यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी फक्त ५०० रुपये पगार घेतला होता. या छोट्याशा रकमेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज त्यांना भारतीय सिनेसृष्टीतल्या सर्वात महत्त्वाच्या स्टार्सपैकी एक बनवून गेला आहे.
थलपती विजयनेही बालकलाकार म्हणूनच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. 'वेत्री' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करताना त्याने ५०० रुपये मानधन घेतलं होतं. त्यानंतर मुख्य अभिनेता म्हणून त्याने अनेक हिट चित्रपट दिले आणि तो आघाडीचा स्टार बनला. सिनेमात काम करताना विजय २०० कोटींहून अधिक मानधन घेत होता. आता सिनेमे सोडून त्याने राजकारणात प्रवेश केला आहे.
चाहते प्रेमाने 'थला' म्हणत असलेल्या अजित कुमारने कोणत्याही फिल्मी बॅकग्राउंडशिवाय केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं. आज १२० कोटींहून अधिक मानधन घेणाऱ्या अजितने सुरुवातीच्या काळात खूप कमी पैशांत काम केलं होतं. त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी फक्त २,५०० रुपये मानधन घेतलं होतं. रोमँटिक हिरो म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास नंतर ॲक्शन हिरो आणि रेसर असा बदलत गेला. आज तो तमिळ सिनेसृष्टीतला एक मोठा सुपरस्टार आहे.
अभिनेता धनुषचा सिनेप्रवास खूपच वेगळा राहिला आहे. सुरुवातीला त्याला अनेक टीकांचा सामना करावा लागला, पण आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तमिळ सिनेमाच्या पलीकडे जाऊन त्याने तेलुगू, हिंदी आणि अगदी हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली आहे. आज एका चित्रपटासाठी ६० कोटी रुपये घेणाऱ्या धनुषने त्याच्या 'थुल्लुवाधो इलामाई' या पहिल्या चित्रपटासाठी सुमारे ५,००० रुपये मानधन घेतलं होतं.
कॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सूर्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. आज त्याचं मानधन १०० कोटींच्या घरात पोहोचलं आहे. पण त्याचा पहिला पगार ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. सिनेमात येण्यापूर्वी सूर्या एका गारमेंट्स कंपनीत काम करायचा. तिथे तो महिन्याला फक्त ७३६ रुपये पगार घ्यायचा.