Shalmali Kholgade : आवाज, मंच असूनही बोलता येऊ नये, ही कसली लोकशाही? गायिका शाल्मली खोलगडेची उद्विग्न प्रतिक्रिया

Published : Jul 21, 2026, 08:38 PM IST
Shalmali Kholgade

सार

Shalmali Kholgade on Delhi Protest : गायिका शाल्मली खोलगडेने दिल्लीतील आंदोलनावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. मंच असूनही बोलता येत नाही, ही कसली लोकशाही? असा सवाल तिने केला आहे.

मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. मोर्चा संसदेकडे निघाल्यानंतर तरुण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनांमध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. काल २० जुलै रोजी, रविवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटीदेखील याविरोधात व्यक्त होत आहेत. याच लाठीचार्ज आणि सध्या सुरू असलेल्या आंदोलनच्या परिस्थितीवरुन लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शाल्मलीने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ही कसली लोकशाही आहे? असा सवाल केला आहे. शाल्मलीने नेमकं पोस्टमध्ये काय म्हटलंय?

तिने लिहिलंय, 'परवा रात्री खूप रडले, पण सकाळी पळायला गेले तेव्हा थोडी मनाला शांती मिळाली. मी काही मोठी सेलिब्रिटी नाही, पण काहीच करता येऊ नाही, याची धुसमट खरी आहे. मी आज सकाळची तिकीटं काढलेली दिल्लीला जायला, पूर्ण तयारी होती माझी प्रोटेस्टचा भाग व्हायची, पण माझ्या कुटुंबाला जपण्यासाठी म्हणून मी गेले नाही.'

'आवाज असूनही, एक मंच असूनही बोलता येऊ नये ही कसली लोकशाही? कोणाचीच बाजू घेत नाही, नुसती एक विनंती करते तुम्हाला, प्रश्न विचारा, खंत व्यक्त करा, डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका, करा... माझ्या या विचारांनाही प्रश्न करा, पण तसेच आपल्या नेत्यांनाही प्रश्न करा. बस मान खाली ठेवून सगळं सहन करू नका', असं म्हणत तिने संपूर्ण आंदोलनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. #chalosansad20thjuly असा हॅशटॅग वापरत तिने फेसबुक पोस्ट केली आहे. तसंच कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनाही तिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

शाल्मली खोलगडे पोस्ट

दरम्यान, नीट पेपर लीक प्रकरणानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी पुढे आली. त्यांच्या या मागणीला सामाजिक कार्येकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला. सोनम यांनी दिल्लीतील जंतरमंतर इथे २३ दिवस उपोषण केलं. आजही त्यांचं उपोषण सुरूच आहे. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा नेण्यात आला. मात्र या मोर्चादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर देशातील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

लहानपणी अमृता होती डॅशिंग, रिक्षावाले काका भेटले तर काय बोलतात?
लॉर्ड्सवर अक्षयचा नवा अवतार; पांढऱ्या दाढीतील लुकला चाहत्यांनी केलं ट्रोल